Maharashtra Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी आणि खाटूश्यामच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राजस्थान येथील खाटू श्याम भगवानच्या दर्शनासाठी किंवा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्रवास सोयीचा होणार आहे. रेल्वे कडून एका नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे.
रेल्वे हिसार ते तिरुपती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. हिसार ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या गाडीला राजस्थान येथील रिंगस रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

त्यामुळे ज्या भाविकांना खाटूश्यामला जायचे असेल ते रिंगस या रेल्वे स्थानकावर उतरून तेथून खाटू श्यामला जाऊ शकणार आहेत. म्हणजे या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे राज्यातील भाविकांना तिरुपती बालाजी आणि खाटू श्यामला जाणे सोपे होणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत तसेच ही गाडी महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचाही आढावा आज आपण येथे घेणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक ?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार तिरुपती – हिसार विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 07017 ही गाडी 10 जुलै ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक बुधवारी तिरुपती रेल्वे स्थानकावरून अकरा वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 07018 म्हणजेच हिसार – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 14 जुलै ते 28 सप्टेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर रविवारी हिसार रेल्वे स्थानकावरून अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सोडली जाणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
ही गाडी महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. विदर्भातील अकोला शेगाव मलकापूर आणि खानदेशातील भुसावळ जळगाव नंदुरबार या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबा घेणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
या गाडीला राजस्थानातील रिंगस रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर असून ज्यांना खाटू श्यामला जायचे असेल ते या रेल्वे स्टेशनवर उतरून पुढे खाटू श्यामला जाऊ शकतात.