राहुरी- दि. १० जुलै रोजी सायंकाळी पोलीस पथक पकडण्यासाठी येत असल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरथ परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली. दोघांपैकी एकजण पोहून बाहेर आला. मात्र, रामा माळी या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवसांनी, काल रविवारी त्याचा मृतदेह फुगून पाण्यावर तरंगताना आढळून आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी सागितले, की लक्ष्मीबाई भागवत बाचकर (वय ६५ वर्षे, रा. जांभळी, ता. राहुरी) आणि त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे दि. ९ जुलै रोजी रात्री त्यांच्या घरात झोपले होते. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास तीन भामटे त्यांच्या घरात घुसले. त्यांनी लक्ष्मीबाई बाचकर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, कानातील फुले आणि पेटीतील चार तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अंबादास यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भामट्यांनी लक्ष्मीबाई आणि अंबादास यांना काठीने मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला.

लक्ष्मीबाई बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी रवि (पूर्ण नाव माहीत नाही, रा. जांभळी, ता. राहुरी) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा क्रमांक ७६०/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०९ (६), ३ (५) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दि. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी वावरथ येथे पोहोचले. पोलिस पथक येत असल्याचे लक्षात येताच रामा ज्ञानदेव माळी (वय २९ वर्षे) आणि संदिप बर्डे (वय २७ वर्षे, रा. गंगाधर वाडी, वावरथ जांभळी, ता. राहुरी) या दोघांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली. संदिप बर्डे हा पोहून बाहेर आला, मात्र रामा माळी पाण्यात बुडाला.
पोलिस प्रशासनाने सलग तीन दिवस धरणाच्या पाण्यात शोधमोहीम राबवली, पण यश आले नाही. अखेर काल रविवारी दि. १३ जुलै २०२५ रोजी, रामा माळी याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत.