पुण्यातील महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या राहत्याच्या तरूणाला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात, चौकशीसाठी घेऊन गेले दिल्लीला

Published on -

राहाता- पुणे येथील एका महिलेच्या बचत खात्यातून आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) व यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) या ई बँकिंग प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी राहाता येथील एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, जानेवारी २०२३ ते मे २०२५ पर्यंत ईशान लाहिरी यांच्या पुणे वानवडी येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेतील बचत खात्यातून वेळोवेळी खाते धारकाच्या संमतीशिवाय अनेक अनधिकृत व्यवहार करून सुमारे १७लाख २५ हजार रुपये लुटून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहाता येथील आरोपी आनंद विलास सोमवंशी याला दि. २५ जून रोजी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दिल्ली येथे नेले आहे.

पुणे येथे राहणारी ईशान लाहिरी यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यांचा मुलगा इंद्रजित लाहिरी, (रा. निवासस्थान ८७, दुसरा मजला, संत नगर, पूर्व कैलास) दिल्ली येथे राहतो. आपल्या आईच्या बँक खात्यातून पैसे कमी होतात, कोणीतरी काढतयं असे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने याप्रकरणी बँकेकडे चौकशी केली. स्टेटमेंट काढूना बँकेला नोटीस बजावली. खातरजमा केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की आपल्या आईची फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने दिल्ली पोलिसांत सायबर सेलला तक्रार दाखल केली.

पोलिसांनी बँक स्टेटमेंट तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता राहाता येथील आनंद सोमवंशी याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्याने आपला मोबाईल नंबर संबंधित खात्याला लिंक केला असल्याचे समजले. प्राथमिक तपासात सोमवंशी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहाता पोलिसांच्या मदतीने आरोपी आनंद सोमवंशी याला राहात्यातून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी दिल्ली येथे नेले आहे.

आरोपीने एकूण १७ लाख २५ हजार रुपयांच्या सायबर फसवणुकीसह गंभीर गुन्हे केले असून दिल्ली पोलिसांनी आरोपी आनंद वसंत सोमवंशी याचेकडून एक फोन, महत्त्वाची कागदपत्रे, बँकांची पासबुक, चेकबुक/डेबिट कार्ड व मोबाईल कार्ड जप्त केले आहेत. आरोपी विरोधात पोलीस स्टेशन गुन्हे शाखा, दिल्ली येथे एफआयआर क्रमांक १५०/२०२५, डीटी, १९/०६/२०२५ बी एन एस कलम ३१८(४)/३१९(२) नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे शाखा दर्यागंज दिल्ली येथील सायबर सेल शाखेचे सीनियर इन्स्पेक्टर प्रमोद कुमार या घटनेचा तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!