शिर्डी- ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे ऊर्फ भूपेंद्र पाटील याला नंदुरबार पोलिसांनी अटक करून रविवारी शिर्डीत आणले. शेकडो ठेवीदारांची फसवणूक करून पलायन केलेल्या भूपेंद्रला शिर्डीत पोलिसांनी आणताच त्याच्या आलिशान बंगल्यावर कारवाई करत तेथे सील मारण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की या घोटाळ्यामुळे साईबाबा संस्थानचे तब्बल १३०० कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेकडो ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेवीदारांच्या गाऱ्हाण्यांमुळे शिर्डीत संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांमध्ये भूपेंद्र आणि त्याच्या टोळीविषयी तीव्र चीड आणि निराशा पसरली आहे. अनेकांनी या घोटाळ्यामुळे आयुष्यभराची बचत गमावल्याचे सांगितले.
भूपेंद्रसह त्याचे वडील, भाऊ यांच्यासह एकूण सात जणांविरोधात नंदुरबार, शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र संरक्षण ठेवीदार अधिनियम आणि विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र भूपेंद्र सोडून इतर आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्रातील
अनेक जिल्ह्यांत असून, नव्या ठेवीदारांच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी दुपारी शिर्डीत पोहोचताच पोलिसांनी भूपेंद्र पाटीलचा आलिशान बंगला सील केला. या बंगल्याचा वापर भूपेंद्रने ‘ग्रो मोअर’च्या नावाने अनेक गुंतवणूकदारांची भेट घेण्यासाठी केला होता, अशी माहिती उघड झाली आहे. यामुळे ठेवीदारांच्या मनात असलेला संशय अधिक बळावला आहे.
शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी इतर फरार आरोपी आणि दलालांना तातडीने अटक करावी, तसेच सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये नेमके कुठे गेले याचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांच्या पैशांनी मालामाल झालेल्या टोळीने सामान्यांचा विश्वास हरवला आहे.
या घोटाळ्यामुळे शिर्डी परिसरात गुंतवणुकीविषयीचा विश्वास डळमळीत झाला आहे. ठेवीदारांनी पोलिसांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली असून, या प्रकरणात भूपेंद्रसह सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.