शिर्डी- गावपातळीवरील सार्वजनिक प्रश्नांबाबत अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र बसून योग्य मार्ग काढावा. व्यक्तिगत प्रश्नांसाठी कार्यालयीन पातळीवर पाठपुरावा होईलच, मात्र कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांची अडवणूक होणार नाही, या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात मंत्री विखे पाटील यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. तब्बल ६ तासाहून अधिक वेळ चाललेल्या या दरबारात जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने मांडली. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे समजून न घेत, ना. विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या निवेदनांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.

मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी अनेक गावांतील शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यांनी सार्वजनिक रस्ते, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी, वाहतुकीसाठी पूल, गावांतील अतिक्रमण या विषयांवर निवेदने सादर केली. यावर त्यांनी स्पष्ट सांगितले की, अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र बसून योग्य उपाययोजना करावी. विकासकामांसाठी आराखडा तयार करा, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वर्षी आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन उत्तम झाले याबद्दल अनेक ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. पावसाचे प्रमाण कमी असले तरी आवर्तनामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. भविष्यातही गरज लक्षात घेऊन निळवंडे धरणातून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जलजीवन योजनेच्या संदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गावात प्रत्यक्ष जाऊन योजनांतील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले.
मंत्री विखे पाटील यांचा पुढील जनता दरबार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दुपारी २ वाजता होणार आहे. राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षीय स्तरावर प्रत्येक मंर्त्याचे जनता दरबार आयोजित करण्यात येत आहेत.