भूमिगत गटाराच्या चेंबरमध्ये मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळांनी केले सुपूर्द

Published on -

संगमनेर- भूमिगत गटारीतील चेंबरमध्ये साफसफाईचे काम करताना मृत्यू झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. तसेच, त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेले आणि मृत्युमुखी पडलेले रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी यांच्या आणि संजय गांधीनगर येथील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांनी यावेळी आपली संवेदना व्यक्त करत, राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये मैला काढताना अतुल पवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले रियाज पिंजारी यांचा देखील प्राण गेला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आमदार खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलिस प्रशासनाला तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठेकेदार एका राजकीय
पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आमदार खताळ यांच्या पुढाकारामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आ. खताळ यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून पीडित कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांनी संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. यावर आमदार खताळ म्हणाले की, गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आरोपी अटळपणे अटकेत जातील. त्यांनी कितीही जामिनासाठी प्रयत्न केला, तरी कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष व भाजप नेते जावेद जहागीरदार, अॅड. श्रीराम गणपुले, शौकत जहागीरदार, मजहर शेख, बबलू काझी, गुड्डू शेख, राहुल भोईर, आसिफ पिंजारी, मेहबूब शकील पिंजारी, इरफान मसूरी, इरफान पिंजारी तसेच मयत अतुल पवार यांच्या निवासस्थानी प्रकाश पवार, आप्पा पवार, सोमनाथ रणशूर, अण्णा शिंदे, शशिकांत पवार, सतीश शिंदे, नारायण शिंदे, अंबादास शिंदे, संतोष पवार, बबलू पवार, शरद रणशूर, संजय शिंदे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!