श्रीरामपूर- तालुक्यातील वाढत्या वीज टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभारल्या जाणाऱ्या २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
वीज उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर एमआयडीसी येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. ५९ कोटी ६२ लाख रुपये खर्चुन हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, या उपकेंद्रामुळे श्रीरामपूर नौद्योगिक वसाहत, एमआयडीसी रिसर, बेलापूर, भोकर, नायगाव, रेगाव, सुतगिरणी, शिरसगाव, क्कलगाव, मातापूर आणि सन फ्रेश कंपनी या भागांतील वीजदाबाची समस्या कायमची दूर होणार आहे.
यामुळे शेतीला आणि औद्योगिक क्षेत्राला दर्जेदार व स्थिर वीजपुरवठा होईल, ज्याचा थेट फायदा नवीन उद्योगांना चालना आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन या स्वरूपात मिळेल.
महाट्रान्सको या राज्याच्या वीज वाहतूक कंपनीमार्फत हा प्रकल्प एक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी १ लाख कोटींच्या जलसंधारण योजनांवर काम सुरू आहे. गोदावरी-जायकवाडी प्रकल्प, पाण्याचे पुनर्वहन, भंडारदऱ्यातील अतिरिक्त पाण्याचे नियोजन आणि खोऱ्यांमधील योजनांच्या अंमलबजावणीवर सरकार भर देत आहे. केवळ भाषणे आणि मोर्चे न काढता, प्रत्यक्ष कृतीतून सरकार आपले कार्य दाखवत आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.
आमदार हेमंत ओगले म्हणाले की, सध्या श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर व नेवासा तालुक्यातून वीजपुरवठा होतो. परिणामी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होतात आणि शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या उपकेंद्रामुळे ही समस्या दूर होईल. यामुळे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळेल व स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
प्रास्ताविक महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी केले. यावेळी अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, अशोक मडावी, हादी खान, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, नितीन दिनकर, दीपक पठारे, जितेंद्र छाजेड, नानासाहेब शिंदे, सुधीर नवले, सचिन गुजर, शरद नवले, अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते.