अहिल्यानगर- आधुनिक जीवनशैलीत मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी सकारात्मक जीवनपद्धती आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. मानकन्हैया ट्रस्ट व आनंदऋषी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजयोगा जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉ. सुधाताई कांकरिया लिखित हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, डॉ. रतन राठोड, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुनील म्हस्के, बी. के. निर्मला दिदी, अभय आगरकर, डॉ. वसंत कटारिया, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, लेखिका डॉ. सुधा कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या पुस्तकात केवळ शारीरिक नव्हे, तर मन, शरीर व आत्म्याच्या संतुलनावर आधारित आरोग्य दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. आधुनिक जीवनशैलीतही सकारात्मक व निरोगी जीवन जगता येईल, यावर मार्गदर्शन करणारे हे पुस्तक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
डॉ. कांकरिया यांचे विचार नवा दृष्टीकोन देणारे
आजच्या धकाधकीच्या जीवनात डॉ. सुधाताई कांकरिया यांनी मांडलेले विचार हे अंतर्मुख करून आरोग्याच्या दृष्टीने नवा दृष्टीकोन देणारे आहेत, असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतूक केले. तसेच, डॉ. कांकरिया यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झाल्याचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले.