अहिल्यानगर- महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनेक वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण व्हावा. त्यासाठी कृती समितीने मागणी केली होती. महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून नगरकरांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.
या कामी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीने महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. माळीवाडा वेस येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच भूमिपूजन होईल. हा पूर्णाकृती पुतळा उभारल्याने नगर शहराच्या वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समिती व सकल माळी समाजाची बैठक आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. याप्रसंगी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सचिव अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, डॉ. रणजीत सत्रे, विनोद पुंड, राजेंद्र पडोळे, प्रकाश इवळे, मळू गाडळकर, नारायण इवळे, आनंद पुंड, संतोष हजारे, ऋषिकेश ताठे, स्वप्निल राऊत, सूरज ताठे, सुदाम गांधले, राहुल बोरुडे, संकेत झोडगे, किरण जावळे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून नगरकरांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामी आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे.
किशोर डागवाले म्हणाले, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे सर्व समाजाचे आदर्श आहेत. माळीवाडा वेस ही शहराचे प्रमुख प्रवेशद्वार असल्याने येथे होणारा पूर्णाकृती पुतळा हा शहराची शोभा वाढविणारा ठरेल. सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.