अहिल्यानगर- जादा परताव्याचे आमिष दाखवत ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या बनावट आर्थिक कंपनीने शिर्डी परिसरातील २१ गुंतवणूकदारांची १ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केली. या कंपनीविरोधात शिर्डी व राहाता पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाला आहे. मोठ्या रक्कमेची फसवणूक असल्याने वरील दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ मध्ये पैसे गुंतवल्यास वर्षात दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखविण्यात आले. याबाबत शीतल गोरखनाथ पवार (वय ३३, रा. पैजनबाबाचा मळा, राहाता) यांनी ४ जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, भूपेंद्र राजाराम सावळे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा.शिर्डी) या मुख्य संशयित आरोपींनी आठ लाखांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरूवातीचे काही महिने परतावा दिल्यानंतर अचानक पैसे देणे बंद करून फसवणूक केली.

अशाच प्रकारची दुसरी फिर्याद अनिल रामकृष्ण आहेर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली. त्यात सुमारे २१ गुंतवणूकदारांची एकूण १ कोटी ६५ लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. यात पुन्हा भूपेंद्र सावळे यासह राजाराम सावळे, संदीप सावळे, भाऊसाहेब थोरात, पुंजा पोटीडे, सुबोध सावळे व अरूण नंदन यांचाही समावेश आहे.
या आर्थिक घोटाळ्याच्या कंपनीत प्राथमिक तपासात सुमारे ३०० ते ३५० कोटींची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या आदेशानुसार, या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करीत तपास सुरू केला आहे..