Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील बाजरपेठेतील ह्या सराफाच्या दुकानावर दरोडा ! २५ तोळे सोने,२५ किलो चांदी घेऊन पसार

Published on -

देवळाली प्रवरा : चारचाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी आज (दि. १४) पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजार पेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

राजेंद्र सुरजमल भन्साळी यांचे राहुरी शहरातील जुनी पेठ येथील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने, चांदीचे दुकान आहे. राजेंद्र भन्साळी हे दि. १३ जुलै रोजी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते.

एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी १४ जुलै रोजी पहाटे अडीच वाजे दरम्यान प्रथम भन्साळी यांच्या दुकान समोरील सीसीटिव्ही कॅमेर्यावर स्प्रे मारला. नंतर शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान भामट्यांनी दुकानात उचकापाचक करून ड्राव्हरमधील सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने व सुमारे २५ किलो चांदीचे दागीने चोरुन नेले.
तसेच दुकानातील सीसीटिव्ही कॅमेर्याचे डिव्हीआर घेऊन गेले.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपूजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिगारदे, रमीजराजा आतार, राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलिस उप निरीक्षक संदिप मुरकुटे, हवालदार विजय नवले, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे आदी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

त्यानंतर अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीमा नामक श्वान जागेवरच घुटमळले. त्यामुळे तपास कामात अडचणी निर्माण झाल्या. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!