तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी तासन्तास प्रयत्न करूनही यश न मिळालेल्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने एक नवीन नियम जाहीर केला आहे, जो प्रवाशांना अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि बिनधास्त तिकीट बुकिंगचा अनुभव देईल. 15 जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या या नव्या प्रणालीमुळे आयआरसीटीसी खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आवश्यक होणार आहे, आणि त्यातून तिकीट बुक करणं अधिक सोपं व निश्चित होईल.

15 जुलैपासून नवीन नियम
अनेक प्रवासी आजही तात्काळ तिकीट बुक करताना अडचणीत सापडतात. बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच सर्व तिकीट गायब होतात. अनेकदा त्यामागे एजंट्स किंवा बॉट्सचा हात असतो, जे तिकीट आधीच बुक करून टाकतात. ही अडचण दूर करण्यासाठीच रेल्वेने आधार पडताळणीचा नियम लागू केला आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना अधिक संधी मिळणार असून एजंटांची एकाधिकारशाही थांबवली जाईल.
नवीन नियमानुसार, तात्काळ तिकीट बुक करताना आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो टाकूनच तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. आता ओटीपीशिवाय कोणतंही तिकीट बुक होणार नाही. शिवाय, जे प्रवासी आधीच आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक करून ठेवतील, त्यांना बुकिंग विंडो उघडण्याच्या 10 मिनिटं आधीच प्रवेश मिळेल, जे निश्चितच एक मोठा फायदा आहे.
या बदलामुळे अधिकाऱ्यांच्या मते, सिस्टमवरील लोड देखील कमी होईल. कारण बॉट्स किंवा एजंट्सचा प्रवेश 30 मिनिटांसाठी बंद केला जाईल. परिणामी, सामान्य लोकांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढेल. एक महत्त्वाची बाब म्हणजे, आधारशी लिंक न केलेल्या खात्यांद्वारे महिन्याला फक्त 12 तिकीट बुक करता येतील, तर आधार लिंक केल्यास ही संख्या 24 पर्यंत वाढेल.
आधार लिंक करण्याची प्रोसेस
जर तुम्ही अजूनही तुमचं आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक केलं नसेल, तर ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही www.irctc.co.in वर लॉगिन करून ‘माय अकाऊंट’ टॅबमधून ‘प्रमाणित वापरकर्ता’ पर्याय निवडून, तुमचा आधार क्रमांक टाकून आणि ओटीपीद्वारे पडताळणी करून ही लिंकिंग पूर्ण करू शकता. यामध्ये व्हर्च्युअल आयडीचाही वापर करता येतो.
जर तुमच्याकडे आधार नसेल, तर तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाही. कारण ही ओटीपी पडताळणी आता सक्तीची करण्यात आली आहे. स्टेशनवरूनही तिकीट बुक करताना तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि तिथेही ओटीपीद्वारे पडताळणी केली जाईल. तुम्ही दुसऱ्यासाठी तिकीट काढत असाल, तर त्या प्रवाशाचा आधार क्रमांक आणि ओटीपी आवश्यक असेल.
हेल्पलाइन नंबर
कधी कधी तात्काळ बुक केलेलं तिकीट कन्फर्म न झाल्यास ते आपोआप रद्द केलं जातं आणि त्याची परतफेड 2 ते 3 दिवसांत दिली जाते. जर ऑनलाइन तिकीट बुक करताना काही अडचण आली, तर आयआरसीटीसीची हेल्पलाइन 139 वर कॉल करू शकता. आधारसंबंधी अडचण असेल तर UIDAI च्या 1947 क्रमांकावर संपर्क करता येतो.