घरात वेळेचं भान ठेवणं जितकं गरजेचं आहे, तितकंच त्या वेळेच्या ‘दिशेचं’ भान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः वास्तुशास्त्राच्या संदर्भात पाहिलं तर भिंतीवर लावलेलं घड्याळ केवळ वेळ दाखवण्यापुरतं मर्यादित नसतं ते आपल्या घरातल्या ऊर्जा प्रवाहावर आणि अगदी नशिबाच्या दिशेवरही प्रभाव टाकतं. म्हणूनच, घड्याळ कुठे लावायचं, कसं लावायचं, आणि कुठे टाळावं, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

वास्तुशास्त्र सांगतं की घरातल्या प्रत्येक वस्तूचं स्थान, त्याची दिशा आणि तिचं अस्तित्व हे तुमच्या दैनंदिन जीवनावर खोलवर परिणाम करत असतं. अनेकदा आपण रिकाम्या भिंतीवर सहज घड्याळ लावतो, पण त्या निर्णयामागे जर दिशेचा विचार नसेल, तर हे छोटेसे उपकरणही नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं कारण ठरू शकतं. उदाहरणार्थ, घरात उत्तर, पूर्व किंवा पश्चिम या दिशांमध्ये घड्याळ लावल्यास, केवळ वेळेवर लक्ष राहात नाही, तर कामात यश, वेळेचं भान आणि मनःशांतीसुद्धा अनुभवायला मिळते.
ड्रॉइंग रूम
ड्रॉइंग रूम असो वा बेडरूम या खोल्यांमध्ये घड्याळ लावताना एक गोष्ट लक्षात घ्या, की कोणतीही व्यक्ती जेव्हा खोलीत प्रवेश करते, तेव्हा त्याचं पहिलं लक्ष घड्याळावर जावं. असं झाल्यास व्यक्ती वेळेबाबत अधिक जागरूक राहते आणि आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडण्याकडे कल वाढतो. शिवाय मनही अधिक स्थिर राहतं.
बंद घड्याळ ठेवू नका
घड्याळ स्वच्छ असणं हे एखाद्या देवळातल्या समईसारखं आहे. धूळ, गंज, किंवा बंद पडलेलं घड्याळ घरात असणं म्हणजे वेळेचा अडथळा, आणि त्यामुळे यशात विघ्ने येण्याची शक्यता असते. बंद घड्याळ नेहमीच नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानलं जातं. त्यामुळे अशा घड्याळाची त्वरित दुरुस्ती करावी.
दक्षिण दिशा टाळा
वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमाची दिशा मानली गेली आहे. त्यामुळे या दिशेला घड्याळ ठेवणं टाळावं, अन्यथा आयुष्यात अडथळे, मानसिक अस्वस्थता, आणि आर्थिक नुकसान यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे, घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा त्याच्या वरच्या भागात घड्याळ लावल्यास, घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा थांबतात आणि तणाव निर्माण होतो. झोपताना उशीखाली घड्याळ ठेवणंही टाळावं, त्यामुळे झोपेचा र्हास होतो आणि मानसिक तणाव वाढतो.
घडयाळ भेट देऊ नका
घड्याळ एखाद्याला भेट देणं, हे आपण सहज करतो. पण वास्तुशास्त्रात हे शुभ मानलं जात नाही. घड्याळ म्हणजे वेळ, आणि ती कोणाला भेट देणं म्हणजे आपला काळ दुसऱ्याच्या हातात देणं, असा भाव त्यामागे आहे. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
शेवटी, तुम्ही घरात घड्याळ कुठेही लावलं तरी त्यातली वेळ नेहमी अचूक असावी. वेळ पुढे-मागे असणं हे आयुष्यात गोंधळ निर्माण करतं. ड्रॉइंग रूममध्ये लावलेलं घड्याळ घरात चैतन्य आणतं. आणि जेव्हा तुम्ही गोल किंवा आयताकृती घड्याळ निवडता, तेव्हा ती दिशा आणि सौंदर्य दोन्ही सांभाळले जातं.