श्रीरामपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील खैरी निमगाव आणि भैरवनाथनगरच्या दरम्यान, झाडाझुडपांच्या आड एक तरुणाचा मृतदेह सापडला. वयाच्या ३५ च्या आसपास असलेल्या या तरुणाचा मृतदेह इतका कुजलेला होता की, पाहणाऱ्यांचं काळीज सुन्न झालं. चेहराही ओळखू येण्याजोगा नव्हता.
ही घटना समजताच, गावात भीती आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एखाद्याने ही माहिती पोलिसांपर्यंत पोचवली आणि लगेचच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भैरवनाथ बनाजवळ खोल खड्यात तो मृतदेह सापडला. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी पँट घातलेली होती. पण त्याच्या अंगाजवळ ओळख पटवण्यासारखा कुठलाही कागद, मोबाईल किंवा ओळखीचा पुरावा सापडलेला नाही.

घटनास्थळी पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. लोक आपापल्या अंदाजांनी बोलू लागले “कोण असेल हा?”, “कुठून आलाय?”, “काय घडलं असेल नेमकं?”.शरीराची अवस्था आणि त्यातून येणाऱ्या वासामुळे हा मृतदेह तिथे काही दिवसांपासून पडलेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय.
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सध्या तांत्रिक पद्धतीनं ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणामागे घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. उलट, परिस्थिती पाहता कुठेतरी ही हत्या असू शकते, असं वाटतंय.
श्रीरामपूर तालुक्यातल्या या घडलेल्या घटनेने सगळ्यांच्याच मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. कोण होता हा तरुण? का आणि कसा गेला? कुणी त्याचं असं काहीतरी केलं का? हे सगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पोलिसांनाही मृताची ओळख पटवणं सध्या मोठं आव्हान वाटतंय.