गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसाच्या उत्सवात साईबाबा संस्थानला साईभक्तांनी तब्बल ६ कोटी ३१ लाख रूपयांची देणगी केली अर्पण

Published on -

शिर्डी- श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ९ ते ११ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी विविध माध्यमांतून तब्बल ६ कोटी ३१ लाख ३१ हजार ३६२ रुपयांची भरघोस देणगी अर्पण केली. या देणगीची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

पत्रकात म्हटले, की या देणगीत रोख स्वरूपात १ कोटी ८८ लाख ८ हजार १९४ रुपये दक्षिणा पेटीत जमा झाले. देणगी काऊंटरवरून १ कोटी १७ लाख ८४ हजार ५३८ रुपये, पीआरओ सशुल्क पासद्वारे ५५ लाख ८८ हजार २०० रुपये, तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन, चेक डीडी आणि मनीऑर्डरद्वारे मिळून २ कोटी ५ लाख ७६ हजार ६२६ रुपये प्राप्त झाले. याशिवाय ६६८.४०० ग्रॅम सोनं (रु. ५७ लाख ८७ हजार ९२५) आणि ६,७९८.६८० ग्रॅम चांदी (रु. ५ लाख ८५ हजार ८७९) साईबाबांना अर्पण करण्यात आली. या कालावधीत ३ लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.

साईप्रसादालयामार्फत १ लाख ८३ हजार ५३२ भाविकांनी प्रसादभोजन, तर दर्शन रांगेतील १ लाख ७७ हजार ८०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. सशुल्क लाडू प्रसाद पाकिटांच्या विक्रीतून संस्थानला ६४ लाख ५ हजार ४६० रुपये उत्पन्न मिळाले.

उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, द्वारावती, साईआश्रम, साईधर्मशाळा आणि मंडपांमध्ये उभारलेल्या अतिरिक्त निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. विविध भागांतून आलेल्या पालख्यांतील पदयात्रींनाही साईधर्मशाळेत निवास मिळाला. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, मिळालेल्या देणगीचा उपयोग साईप्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुले, तसेच साईभक्तांच्या सेवा-सुविधा व सेवाकार्यासाठी केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!