इतिहासात पहिल्यांदाच जुलैमध्येच जायकवाडी धरण ७५ टक्के भरले, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Published on -

हातगाव- राज्यात नं. २ ची पाणीक्षमता असणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी (पैठण) जलाशय जवळपास ७५ टक्के भरल्याने शेवगाव तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही आकडेवारी काल सोमवार (दि.१४) जुलैची असून, गतवर्षी याच दिवशी याच तारखेला धरणात ४.०१ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद आहे. या जलाशयाचा उजवा कालवा बीड जिल्ह्यातील माजलगावपर्यंत १३२ किमी अंतराने नेऊन तो माजलगाव धरणात झिरो करण्यात आला आहे.

मात्र, हा कालवा शेवगाव तालुक्यातून गेला असल्याने या कालव्याखाली येणाऱ्या शेवगाव तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होत आहे, त्यामुळे कालव्यालगतच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. या जलाशयांची पाण्याची क्षमता १०२ टीएमसी असून, त्यामध्ये जिवंत
साठा ७६ टक्के तर मृतसाठा २६ टक्के असल्याची नोंद जलाशयाच्या दप्तरी दिसून येत आहे.

जलाशयाच्या अंतर्गत पैठण उजवा व डावा असे २ कालवे गेलेले असून, डावा कालवा नांदेडपर्यंत २०८ किमी अंतराने तर उजवा कालवा माजलगावपर्यंत १३२ किमी अंतराने गेल्याची नोंद आहे. पैठण उजवा कालव्यांतर्गत पैठण, शेवगाव, गेवराई व माजलगाव या तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येते. माजलगावपर्यंत या कालव्याला एकूण ७४ वितरिका असून, या सर्व वितरिका खूप जुन्या झाल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून त्याची दुरुस्ती न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंपरी, पिंगेवाडी, हातगाव, मुंगी, कांबी या गावांतील बहुतेक क्षेत्र ओलिताखाली येत असून, या व्यतिरिक्तही अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन आपल्या शेतात पाईपलाइनद्वारे पाणी नेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!