चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा अनुभव जितका उत्साही असतो, तितकाच कधी कधी नियमांमुळे गोंधळाचाही असतो. विशेषतः पाण्याची बाटली किंवा काही घरून आणलेले खाण्याचे पदार्थ सिनेमा हॉलमध्ये नेण्याची परवानगी आहे की नाही, याबद्दल लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत. त्यामुळेच आज आपण या सगळ्या बाबतीत थोडक्यात आणि स्पष्टपणे जाणून घेऊया.

सर्वप्रथम, एक गोष्ट लक्षात घ्या सिनेमा हॉल ही खाजगी मालमत्ता असते. त्यामुळे तेथील नियम व्यवस्थापन ठरवतं आणि त्या नियमांचं पालन करणं प्रेक्षकांच्या जबाबदारीत येतं. भारतभरात सुमारे 10,000 हून अधिक सिनेमा हॉल आहेत आणि सर्व ठिकाणी नियम सारखेच असतील असं नाही, तरी काही गोष्टी मात्र जवळपास सर्वत्र लागू होतात.
पाण्याची बाटली
अनेक लोकांना वाटतं की आपण पाण्याची बाटलीही आत नेऊ शकत नाही, पण खरं सांगायचं तर तुम्ही तुमच्यासोबत पाण्याची बाटली घेऊन जाऊ शकता. अनेक ठिकाणी वॉटर कूलरची सुविधा देखील उपलब्ध असते, जिथून मोफत पाणी मिळू शकतं. त्यामुळे स्वतःची बाटली बाळगणं आणि तिला परवानगी मिळणं ही कोणतीही अडचण नाही.
मात्र जेव्हा अन्नपदार्थांची गोष्ट येते, तेव्हा थोडं वेगळं चित्र दिसतं. पिझ्झा, बर्गर, चिप्स किंवा इतर स्नॅक्ससारखे बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ आत नेण्यास बहुतांश ठिकाणी मनाई असते. यामागचं कारण फक्त आर्थिक नाही, तर स्वच्छता आणि सुरक्षिततेशीही संबंधित आहे. हॉलमध्ये अनेक प्रकारची उपकरणं, आसनव्यवस्था आणि साफसफाईचे नियम असतात, जे बाहेरून अन्न नेल्यास बिघडू शकतात.
…तरच अन्नपदार्थांना मिळते परवानगी
मात्र, काही वेळा अपवाद केले जातात. जर तुमच्यासोबत लहान मूल असेल, वृद्ध व्यक्ती असेल किंवा कोणीतरी आरोग्याच्या कारणामुळे विशिष्ट अन्नच खाऊ शकत असेल, तर अशा वेळी व्यवस्थापनाशी बोलून विशेष परवानगी घेता येते. सर्वोच्च न्यायालयानेही अशा विशिष्ट प्रसंगांत मानवीतेच्या दृष्टिकोनातून लवचिकता दाखवण्यावर भर दिला आहे.
तुम्ही जर सिनेमा हॉलमध्ये काही खाण्याचा विचार करत असाल, तर तो पर्याय हॉलच्या कॅन्टीनमध्ये हमखास उपलब्ध असतो. किंमत जास्त वाटू शकते, पण तेच अधिकृत आणि नियमबद्ध मार्ग मानला जातो.