श्रीगोंदा- मुलाच्या खोलीला कडी लाऊन झोपेतून जागे झालेल्या साठ वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत तसेच कानातील सोन्याचे फुले-वेल बळजबरीने तोडून घेत ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील निमगांव खलू येथे घडली.
या घटनेत श्रीमती चंपावती दत्तात्रय दिवटे (वय-६०), ही वृद्धा गंभीर जखमी झाली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चंपावती दिवटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या झोपलेल्या असताना दि. १४ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरात एक इसम बॅटरीच्या उजेडात घरातील सामानाची उचका- पाचक करीत असल्याचे दिसले.

फिर्यादीने आरडा-आरोडा केल्याने अज्ञात इसमाने फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली. कानामध्ये असणारे सोन्याचे फुले-वेल बळजबरीने तोडून घेतल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड झाल्याने अज्ञात चोरटा तेथून पळून गेला. जाताना चोरट्याने फिर्यादीच्या मुलाच्या खोलीला बाहेरून लावलेली कडी खोलून घरात पाहणी केली असता, घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची अंगठी तसेच फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील सोन्याचे फुले, असा ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.