शिर्डी- महायुती सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी शिर्डी मतदारसंघात प्रभावीपणे होत असून, या क्षेत्राने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील ३४१ लाभार्थ्यांना गृह उपयोगी भांडेसंच वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती विखे पाटील मार्गदर्शन करत होत्या. या वेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाल्या, की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिर्डी मतदारसंघात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनसेवा कार्यालयाचे समन्वयक सातत्याने करत आहेत. या प्रयत्नांमुळे योजनांचा थेट लाभ गरजूंना मिळतो आहे. मंत्री विखे पाटील व प्रवरा कारखान्याचे
अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्र तून मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
त्यामुळे शिडी मतदारसंघ व अहिल्यानगर भागात राज्यातील सवाधिक योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, शेतकरी, ऊसतोडणी कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी अपघाती विमा, शैक्षणिक सुविधा यांसारख्या योजनांचा प्रभावी अवलंब शिर्डी मतदारसंघात होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ योजना राबवण्यात राज्यात अग्रगण्य ठरला आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या योजना जनतेसाठी लाभदायक ठरत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ योजनेसाठी जनसेवा कार्यालयात स्वतंत्र नोंदणी व मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून, याचा लाभ राहाता, श्रीरामपूर, राहुरी व कोपरगाव तालुक्यांतील नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी शिर्डी मतदारसंघातील प्रवरा, आश्वी व गणेश परिसरातील विविध गावांतील ३४१ लाभार्थ्यांना गृह उपयोगी भांडेसंच वितरित करण्यात आले.