राज्यातील साखर कामगारांना १० टक्के वेतनवाढ मिळणार, खासदार शरद पवारांनी घेतला बैठकीत निर्णय

Published on -

सोनई- राज्यातील साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व १६ महिन्याचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी काल सोमवारी (दि. १४) मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष डी. एम. निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील बैठकीला महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊ शंकर पाटील, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, त्रिपक्ष समिती सदस्य जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते.

साखर कामगारांना वेतनवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्व साखर कामगार संघटनांनी एकत्र येऊन वेळोवेळी पाठपुरावा केल्याने डिसेंबर २०२४ मध्ये त्रिपक्ष समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या सहा महिन्यात चार बैठका झाल्या व समितीची मुदत संपली. शेवटची बैठक १३ जून रोजी झाली. त्यामध्ये वेतन वाढीचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांच्या कोर्टात ढकलला होता.

त्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याबद्दलचा सविस्तर करार २३ जुलै रोजी पुणे साखर आयुक्त कार्यालयात त्रिपक्ष समितीच्या बैठकीत होईल. त्यानंतर करारावर स्वाक्षऱ्या होतील. राज्यातील एक लाख साखर कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, उपाध्यक्ष डी. एम. निमसे, मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार आदींसह साखर कामगाराकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. या निर्णयामुळे साखर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या निर्णयाचे पदाधिकाऱ्यांचे कौतुकाचा ठराव केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!