श्रीरामपूर- शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय शेतकरी संघटनेने सुरू केलेला लढा थांबणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिला.
खोकर (ता. श्रीरामपूर) येथे शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा प्रारंभ व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव काळे तर व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शाखाध्यक्ष शिवाजी पटारे, प्रा. कार्लस साठे, हरिभाऊ तुवर, सुरेश काळे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ॲड. अजित काळे म्हणाले, सध्या राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरु आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नाही, शासनाने सोयाबीन खरेदीचा परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. ऊस कारखानदार ऊस भावात शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षाला विधानसभा निवडणुकीपुर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे.
मात्र, शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नसून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय माघार घेणार नाही. श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या आणखी नूतन शाखा स्थापन होणार असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभाग होत आहे. यापुढे तालुक्यातील कुठलीच निवडणूक शेतकरी संघटना बिनविरोध होऊ देणार नाही.
तसेच अशोक कारखाना शेतकरी संघटनेच्या ताब्यात घेणे हे पुढील काळातील लक्ष्य असल्याचे काळे म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, प्रा. कार्लस साठे, डॉ. विकास नवले, अॅड. प्रशांत कापसे आदींची भाषणे झाली. यानंतर येथील कार्यकर्ते शिवाजी पटारे, अशोक काळे, सुरेश काळे, संजय काळे, विजय शेरकर आदी कार्यकर्त्यांचा प्रवेश पार पडला.
याप्रसंगी मेजर अशोक काळे, डॉ. रोहीत कुलकर्णी, साहेबराव चोरमले, डॉ. दादासाहेब आदिक, सतिश नाईक, सागर शिंदे, विठ्ठल बांद्रे, राजेंद्र बांद्रे, शिवाजी आढाव, राजेश काळे, नंदकुमार चव्हाण, प्रदीप काळे, प्रमोद शेरकर, कैलास भणगे, राहुल सलालकर, प्रशांत शिंदे, सचिन वेताळ, बाबासाहेब वेताळ आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.