अहिल्यानगरमध्ये सापडलेल्या ६६ लाख रूपयांच्या बनावट नोटांचे पुणे कनेक्शन उघड, पोलिसांकडून आणखी आरोपींचा शोध सुरू

Published on -

अहिल्यानगर- राहुरी शहरालगत नगर-मनमाड रस्त्यावर दुचाकीवरील तिघांना पकडून बनावट नोटा जप्त केल्या. तपासात पोलिसांनी टेंभुर्णी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील बनावट नोटा बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून सुमारे ६६ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

आता या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांनी पुण्यात बनावट नोटा वितरित केल्याने बनावट नोटांचे पुणे कनेक्शन स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात पुण्यात बनावट नोटांचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.

राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे आणि त्याचे गस्ती पथक २८ जुलै २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता राहुरी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना नगर-मनमाड रस्त्यावरील गाडगेबाबा विद्यालयासमोर दुचाकीवर बनावट नोटा घेऊन तिघांना पथकाने पकडले.

पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय ३३ रा. सोलापूर, राजेंद्र कोंडिबा चौघुले वय ४२, रा. कर्जत जि. अहिल्यानगर, तात्या विश्वनाथ हजारे वय ४० रा. पाटेगाव ता. कर्जत अशी ताब्यात घेतलेल्यांनी नावे सांगितली होती. पोलिसांनी त्याच्या जवळील नोटा जप्त करून त्या अॅक्सिस बँक मैनेजरकडून तपासून घेतल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशी त्यांनी टेंभुणी ता. करमाळा, जि. सोलापूर येथील शीतलनगर येथे बनावट नोटा तयार करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेंभुर्णी येथे छापा घालून बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, प्रिंटर, कटिंग मशिन, कागद, नोटा मोजण्याचे मशिन, लॅमिनेशन मशिन, कंट्रोल युनिट असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, पाचशे रुपयांच्या ३७ लाख ५० हजार, दोनशे रुपयांच्या ८ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा तर, पाचशे रुपयांच्या कट न केलेल्या १८ लाख रुपयांच्या बनावट अशा सुमारे ६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

वरील तीनही आरोपीविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात आरोपीचे आणखी काही कारनामे उघडकीस आले आहेत. आरोपींनी बनावट नोटा छापू त्या कोठे वितरित केल्य. याचा पोलिस शोध घेत असताना पुणे शहराचे नाव समोर आले. आरोपींनी पुणे शहरात नोटा वितरित केल्याचे स्पष्ट झाले असून, या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील एक आरोपी पुणे जिल्ह्यातील तर एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आहे. पोलिस पथक आरोपींचा कसून शोध घेत असून, आरोपी सापडल्यानंतर त्यांनी आणखी कोठे नोटा वितरित केल्या याचा पोलिसांना शोध लागणार आहे.

दरम्यान, टेंभुर्णी येथे छापलेल्या बनावट नोटा पुणे शहरातील काही बँकमध्ये आढळून आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी बँकेत करण्यासाठी नेलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चार ते पाच बनावट नोटा आढळून आल्या आहेत. त्या नोटा आणि राहुरी, टेंभुर्णी येथे सापडलेल्या नोटा एकाच आहेत. तसेच बनावट नोटा संदर्भात पुणे शहरात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा छापून त्या पुणे जिल्ह्यात वितरित केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बनावट नोटांच्या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्या आरोपींचा कसून शोध सुरू आहे. ते दोन आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आणखी कुठे बनावट नोटा वितरित केल्या हे समोर येणार आहे.

– संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक राहुरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!