अहिल्यानगर- शहराच्या दिल्लीगेट परिसरात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता भरधाव डंपरने शहर बस थांबा येथे उभे असलेल्या व्यक्तीला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांची गर्दी जमली असता डंपर चालक पसार झाला.
प्रकाश नाना अवचर (वय ३५ रा. दातरंगे मळा, ता, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. शहरातील दिल्लीगेट परिसरात एएमटी शहर बस थांबा असलेल्या ठिकाणी प्रकाश अवचर थांबले होते.

सकाळी साडेनऊ वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने त्यांना चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच नागरिकांनी गर्दी केली. अपघातानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान मयत प्रकाश अवचर यांचा मेव्हुणा राजकिरण पटेकर दिल्लीगेट परिसरातून जात असताना त्यांना अपघात झाल्याचे समजले. पटवेकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.