अहिल्यानगर- नगर तालुक्यासह विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिणेतील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांबाबत मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके कोमजण्यास सुरुवात झाली असून बळीराजासमोर संकट उभे राहिले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
मे महिन्यात अवकाळी पावसाने नगर तालुक्यासह जिल्हाभरात धुमाकूळ घातला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवरच बहुतांशी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. या पावसात वाळकी, अकोळनेर, खडकी, खंडाळा, सारोळा कासार या पद्यात मान्सूनपूर्व पावसाने बंधारे, नाले, तलाव तुडुंब झाले होते. परंतु तालुक्यातीलच चिचोंडी पाटील, हिंगणगाव, जखणगाव, विळद, देहरे, जेऊर याभागात मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने या भागात अद्यापही पाण्याची पातळी वाढलेली नाही. मान्सून पूर्व पाऊस देखील अत्यल्पच झाला होता.

त्यात जुनच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या सर्वदूर झालेला पाऊस व नंतर मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात पावसाच्या सरी चांगल्या बरसतील या अपेक्षेवर बळीराजाने मूग, सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, वटाणा या खरीप पिकांची पेरणी केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने चांगली उगवण झालेल्या खरीप पिकांवर संक्रांत आली आहे.
अनेक भागातील पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने उगवून आलेल्या पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. विविध भागात पिके कोमेजून जाण्यास सुरुवात झाली असून या पिकांना आता पावसाची खूप गरज
आहे. दुबार पेरणीचीही वेळ निघून गेलेली आहे.
त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भागात पाणी उपलब्ध असून देखील खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने बळीराजासमोर अडचण निर्माण झाली आहे. तर अनेक भागात पाण्याची पातळीच वाढली नसल्याने त्यांचा पाणी देण्याचा प्रश्न येत नाही. मान्सूनपूर्व तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर मोठ्या क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
परंतु जुनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकरी राजा चिंतेत आहे. शेतीची मशागत, पेरणी, बियाणे यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या स्वप्नांची राख रांगोळी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.