चुकीची माहिती तुम्हाला आजारी पाडू शकते! ‘best by’ आणि ‘use by’चा खरा अर्थ जाणून घ्या

Published on -

आपण किराणा दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये एखादा खाद्यपदार्थ खरेदी करत असताना त्यावर ‘Best By’ किंवा ‘Use By’ अशा काही तारखा पाहिल्या असतील. बऱ्याचदा आपण या तारखांकडे बघतो आणि ते उत्पादन घेऊ की नको, याचा निर्णय घेतो. पण अनेकांना या शब्दांचा खरा अर्थ माहीत नसतो. बरेच जण या तारखा म्हणजेच ‘Expiry Date’ समजून घेतात आणि अन्नपदार्थ फेकून देतात. पण खरं तर हे समजून घेणं गरजेचं आहे की या तारखा अन्न सुरक्षिततेपेक्षा त्याच्या गुणवत्तेशी अधिक संबंधित असतात.

अनेकदा लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की ज्या दिवशी ‘Best By’ किंवा ‘Use By’ लिहिलं आहे, त्या तारखेनंतर तो पदार्थ लगेच खराब होतो. आणि त्यामुळे बरेच वेळा चांगले अन्न केवळ गैरसमजातून वाया जातं. खरंतर या तारखा उत्पादन कंपन्या ग्राहकांना फक्त हे सांगण्यासाठी छापतात की त्या तारखेपर्यंत ते अन्न सर्वात चविष्ट, ताजं आणि दर्जेदार राहील. म्हणजे तुम्ही त्या तारखेपूर्वी ते खाल्लं, तर त्याचा स्वाद आणि गुणवत्ता सर्वोत्तम असेल. मात्र त्या तारखेनंतर ते अन्न विषारी होतं किंवा खाण्यास धोकादायक होतं असं काहीच नाही.

‘Best By’ चा अर्थ

‘Best By’ ही तारीख उत्पादनाच्या दर्जावर आधारित असते. ती सरकारनं ठरवलेली नसते, तर स्वतः उत्पादक कंपनी आपल्या अनुभवावरून ठरवते. उदाहरणार्थ, काही बिस्किटं, धान्यं, पॅकेज्ड स्नॅक्स, किंवा पास्ता यांसारख्या वस्तू ‘Best By’ नंतरही महिन्याभर आरामात वापरता येतात. फक्त त्यांचा स्वाद थोडा हलकासा कमी होतो.

‘Use By’ चा अर्थ

‘Use By’ ही तारीख मात्र थोडीशी अधिक महत्त्वाची मानली जाते, विशेषतः दुध, मांस, किंवा अंड्यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या अन्नपदार्थांसाठी. पण तरीही, पॅकेजिंग व्यवस्थित असेल, ते फ्रिजमध्ये ठेवलेले असेल आणि वास किंवा रंग बदललेला नसेल, तर ‘Use By’ नंतरही ते पदार्थ वापरणं काही वेळा सुरक्षित असू शकतं. अर्थात, थेट चव घेऊन किंवा डोळ्यांनी, नाकाने निरीक्षण करूनच निर्णय घेणं योग्य ठरतं.

हे सगळं समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणतंही अन्न त्याच्या दिसण्यात, वासात किंवा चवित काही बदल झाला असल्यास फेकून देणं उत्तम. काही वेळा बुरशी, उग्र वास, चिकटपणा किंवा रंग बदल या गोष्टी दिसून येतात. अशा वेळी ‘तारीख चांगली आहे ना’ हे बघण्यापेक्षा स्वतःची इंद्रिये वापरून निर्णय घेणं जास्त सुरक्षित.

डॉक्टरांचंही असं मत आहे की सगळ्यांना खराब अन्नामुळे त्रास होत नाही, पण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल आहे जसं की लहान मुले, गर्भवती महिला किंवा वृद्ध व्यक्ती त्यांना जास्त धोका असतो. अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेणं आवश्यक ठरतं. कारण अन्न विषबाधेमुळे उलट्या, जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

अन्नपदार्थ जास्त दिवस कसे टिकवता येईल?

अन्नपदार्थ अधिक दिवस टिकवायचे असतील तर काही सोप्या सवयी उपयुक्त ठरतात. उदा., मांस आणि चिकन वेगळ्या डब्यात ठेवा, अंडी आणि दूध रेफ्रिजरेटरच्या दारात ठेवू नका कारण तिथे तापमान सतत बदलतं. कोरड्या वस्तू थंड, अंधाऱ्या आणि हवेशीर ठिकाणी साठवा. केळींमुळे इतर फळं लवकर पिकतात, त्यामुळे त्यांना इतर फळांपासून वेगळं ठेवा. नाशवंत गोष्टी वेळेत फ्रीज किंवा डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या अधिक काळ चांगल्या राहतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!