21 पॅरा एसएफसह महिलादेखील होतात पोलाद! ‘या’ शाळेत तयार होतात देशाचे सर्वात घातक कमांडो

Published on -

भारताच्या उत्तरपूर्वेतील घनदाट जंगलांमध्ये, उंचच उंच टेकड्यांच्या कुशीत एक अशी जागा आहे जिथे जवान केवळ सैनिक बनत नाहीत, तर ते मृत्यूशी दोन हात करणारे लढवय्ये घडवले जातात. वैरेंगटे, या मिझोरममधील लहानशा गावात वसलेली ही संस्था म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल, जी संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठित मानली जाते. येथे प्रशिक्षण घेणारा जवान रणांगणावर जातो तेव्हा तो केवळ बंदूकधारी नसतो, तर जंगलासारख्या कठीण परिस्थितीतही आपल्या शत्रूला नामोहरम करणारा निपुण योद्धा असतो.

काउंटर इन्सर्जन्सी अँड जंगल वॉरफेअर स्कूल

या शाळेची स्थापना 1970 साली झाली. त्यामागचा उद्देश स्पष्ट होता, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये वाढत चाललेल्या बंडखोरीला ठोस उत्तर देण्यासाठी एक असे प्रशिक्षण केंद्र उभे करणे, जे सैनिकांना जंगल आणि डोंगराळ भागात युद्धासाठी तयार करेल. आज या संस्थेची कीर्ती अशी आहे की केवळ भारतीय सैनिकच नाही, तर अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, इराक, मॉरिशस आणि केनियासारख्या देशांतील सैनिकही येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

या शाळेत दिले जाणारे प्रशिक्षण कुठलाही सामान्य सैनिक सहन करू शकत नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या थकव्याच्या मर्यादा, झाडाझुडपांतून लपून हल्ला करायच्या पद्धती, कमी अन्न-पाण्यावर तग धरत मिशन पूर्ण करण्याची जिद्द हे सर्व येथे शिकवले जाते. शत्रू कुठे आहे, तो कसा विचार करतो, त्याचा मार्ग कोणता असेल, हे ओळखण्याचं प्रशिक्षण इथे खडतर पद्धतीनं दिलं जातं. इथे सैनिक शिकतो की जंगल हे फक्त हिरवळ नाही, तर एक रणभूमी आहे, जिथे क्षणाचाही चुकीचा निर्णय जीवावर बेतू शकतो.

महिला अधिकाऱ्यांनाही मिळते प्रशिक्षण

या शाळेचा एक मोठा अभिमान म्हणजे 21पॅरा स्पेशल फोर्सेसचे कमांडो. भारताचे हे सर्वात घातक, अत्यंत प्रशिक्षित आणि शत्रूच्या हृदयात भेदकपणे घुसणारे सैनिकही इथेच तयार होतात. त्यांच्या गुप्त मोहिमा, सर्जिकल स्ट्राइक्स, आणि जंगलातील अचूक हालचाली ही याच प्रशिक्षणाची फलश्रुती आहे. हीच शाळा आपल्याच देशातील नाही, तर परदेशातील सैनिकांनाही विशेष प्रशिक्षण देते. त्यामुळे ही जागा केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक लष्करी पातळीवर आदराने पाहिली जाते.

 

हे केंद्र केवळ पुरुष सैनिकांसाठीच मर्यादित नाही. भारतीय लष्करातील महिला अधिकारी देखील येथे प्रशिक्षण घेतात आणि कुठल्याही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कठीण कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण करतात. हा भाग खरोखर प्रेरणादायी आहे, कारण तो लष्करातील लिंग-समानतेचं देखील दर्शन घडवतो.

‘मुक्ती बहिनी’ गट

इतिहासातही या शाळेची भूमिका लक्षणीय ठरली आहे. 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात, भारताने ‘मुक्ती बहिनी’ या लढवय्या गटाला याच शाळेत प्रशिक्षण दिलं होतं. त्यातून पुढे स्वतंत्र बांगलादेशाचा उदय झाला. या घटनेने या शाळेच्या सामर्थ्याला आणि महत्त्वाला एक ऐतिहासिक वळण दिलं.

या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सैनिकांना जंगलात अन्न व पाणी नसतानाही कसं टिकायचं, जंगलातील सापळ्यांना कसं ओळखायचं, आणि स्फोटक उपकरणं विशेषतः आयईडी ओळखून निष्क्रिय कशी करायची हे शिकवणं. यातूनच सैनिक ‘जंगल युद्ध’ या अतिशय गुंतागुंतीच्या युद्धप्रकारात पारंगत होतो. प्रत्येक पाऊल ही संधी असते पण चुकीचं पाऊल मृत्यूकडे घेऊन जाऊ शकतं. आणि इथे मिळणारं प्रशिक्षण त्या प्रत्येक पावलाची जाणीव करून देतं.

CIJWS ही केवळ एक शाळा नाही, ती एक संस्कारभूमी आहे जिथे सैनिक झोप सोडतो, आराम विसरतो आणि मृत्यूच्या छायेतून जगण्याची कला शिकतो. भारताच्या लष्करी सामर्थ्यात या संस्थेचं योगदान अत्यंत मोठं आहे. इथे तयार होणारे योद्धे देशाच्या सीमांचं संरक्षण करताना केवळ शौर्याचं नव्हे, तर समर्पणाचंही जिवंत उदाहरण बनतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!