राज्याभिषेकाच्या वेळी वय फक्त साडेचार वर्षांचं… तरी पुढे तब्बल 72 वर्षं 110 दिवस संपूर्ण देशावर निर्विवाद सत्ता गाजवणारा एक राजा. त्याचं नाव होतं लुई चौदावा. फ्रान्सच्या इतिहासात ‘सन किंग’ म्हणून ओळखला जाणारा लुई, फक्त आपल्या दीर्घ कारकिर्दीसाठीच नव्हे तर आपल्या भव्यतेसाठी, शिस्तबद्ध कारभारासाठी आणि काहीशा अहंकारी स्वभावासाठीही कायम लक्षात राहिला आहे. त्याची कहाणी म्हणजे केवळ राजसत्तेची गाथा नसून, एका बालराजाच्या ‘देवदूत’ समजल्या गेलेल्या जन्मापासून ते एका अजरामर सम्राटाच्या अंतापर्यंतची कहाणी होती.

लुई चौदावा याचा इतिहास
लुईचा जन्म 5 सप्टेंबर 1638 रोजी झाला. त्याच्या जन्माआधी तब्बल 23 वर्षं राजाला आणि राणीला संतानप्राप्ती झालेली नव्हती. इतकंच नव्हे, चार वेळा गर्भधारणेनंतर मुले मृतावस्थेत जन्माला आली होती. त्यामुळे जेव्हा लुईने आरोग्यपूर्ण जन्म घेतला, तेव्हा तो चमत्कारच मानला गेला. त्याचे आई-वडील म्हणजे राजा लुई तेरावा आणि राणी अॅन ऑफ ऑस्ट्रिया, यांनी त्याला ‘देवाचा आशीर्वाद’ मानलं.
राजा लुई तेरावा यांचे निधन झाल्यावर, 14 मे 1643 रोजी केवळ 4 वर्षं 8 महिने वय असलेल्या लुई चौदाव्याला सिंहासनावर बसवलं गेलं. लहान वय असल्यामुळे प्रत्यक्ष सत्ता त्याच्या आई अॅन आणि तिच्या विश्वासू सल्लागार कार्डिनल माझारिन यांनी सांभाळली. या काळात लुईला केवळ दरबारी नीतीच शिकवली गेली नाही, तर राजकारण, युद्ध, धर्म आणि संस्कृती या प्रत्येक बाबतीत त्याचं मोलाचं शिक्षण झालं.
माझारिनच्या मृत्यूनंतर, 1661 मध्ये लुईने सर्वांना आश्चर्यचकित करत स्पष्टपणे जाहीर केलं की, “मीच आता सगळं सांभाळेन, मला मंत्र्यांची गरज नाही.” त्याच्या या निर्णयानं एक नवीन युग सुरू झालं.लुईने सत्तेचा केंद्रबिंदू व्हर्सायच्या राजवाड्यात आणला. याच भव्य राजवाड्यातून त्याने दरबारातील सरंजामदारांची ताकद खुंटवली आणि नोकरशाहीला अधिक प्रशिक्षित आणि जबाबदार केलं. त्याचा कारभार म्हणजे भव्यतेचा, नियंत्रणाचा आणि सत्ता-केंद्रिततेचा एक आदर्श नमुना होता. त्याने राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर स्वतः लक्ष दिलं, सैन्य बळकट केलं आणि फ्रान्सला एक बलाढ्य युरोपीय राष्ट्र बनवलं.
स्पेनची राजकन्या मारिया थेरेसाशी विवाह
त्याच्या खासगी आयुष्याकडे पाहिलं, तर 1660 मध्ये त्याने स्पेनची राजकन्या मारिया थेरेसा हिच्याशी विवाह केला. त्यांना सहा मुले झाली, मात्र एकच मुलगा लुई, ज्याला ‘ग्रँड डॉफिन’ म्हणत तोच मोठं होईपर्यंत जगला. लुईच्या आयुष्यात वैयक्तिक दु:खांची कमी नव्हती, पण त्याने कधीही आपली सत्ता डळमळू दिली नाही.
शेवटी, 1 सप्टेंबर 1715 रोजी, व्हर्साय राजवाड्यात एका आजारामुळे लुई चौदाव्याचा मृत्यू झाला. तो तेव्हा 76 वर्षांचा होता. आणि सिंहासनावर तो आजीवनच राहिला.
आज, लुई चौदाव्याचं नाव घेतलं जातं ते केवळ त्याच्या 72 वर्षांच्या दीर्घकालीन राज्यासाठी नव्हे, तर सत्तेच्या उच्चतम शिखरावर जाऊन त्या ताकदीला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं त्यासाठी. ‘सन किंग’ ही उपाधी त्याला उगाच मिळाली नव्हती, तो खरंच आपल्या काळातील सूर्यच होता, जो पूर्ण फ्रान्सवर तेजानं झळकत राहिला.