द्वितीय महायुद्धानंतर युद्धाच्या पद्धती अनेक वेळा बदलल्या, पण हवाई लढायांमध्ये अद्यापही महागडी विमाने आणि मिसाईल डिफेन्स सिस्टम्स यांचाच वरचष्मा होता. मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. ब्रिटनने एक असा अत्याधुनिक ड्रोन विकसित केला आहे, जो महागड्या विमानांशिवायच दुसऱ्या हवाई लक्ष्यांवर अत्यंत अचूक क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो. हे तंत्रज्ञान जगात प्रथमच यशस्वीरीत्या वापरले गेले असून त्याच्या चाचणीतून भविष्यातील युद्धांचे स्वरूप किती वेगळे असणार आहे याची कल्पना येते.

T150 क्वाडकॉप्टर
ब्रिटनने विकसित केलेले हे नवे शस्त्र म्हणजे T150 हेवी ड्युटी क्वाडकॉप्टर आहे. हे ड्रोन लेसर गाईडेड APKWS मिसाईलने सज्ज आहे, जे 70 मिमीचे रॉकेट 6.5 किलोमीटर पर्यंत डागू शकते. सुरुवातीला याला लष्करी सामान वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत होते. मात्र आता यामध्ये लढाऊ क्षेपणास्त्र लावल्याने ते एका प्राणघातक ड्रोनमध्ये रूपांतरित झाले आहे. हे ड्रोन तब्बल 68 किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकते, त्यामुळे हेलिकॉप्टरची गरज कमी होणार आहे.
या ड्रोनने चाचणी दरम्यान दोन वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्ये नष्ट केली. एक जमिनीवर आणि दुसरे हवाई. वाळवंटात एका मिनी व्हॅनवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला अत्यंत अचूक होता. विशेष म्हणजे अमेरिकेत चाचणीदरम्यान या ड्रोनने दुसरे उड्डाण करणारे ड्रोन यशस्वीरित्या पाडले. अशा प्रकारचा ड्रोनविरोधात ड्रोन हल्ला जगात प्रथमच करण्यात आला आहे.
BAE Systems
हे तंत्रज्ञान ब्रिटनच्या मॅलॉय एरोनॉटिक्स आणि प्रसिद्ध संरक्षण कंपनी BAE Systems यांनी विकसित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोटरी ड्रोनद्वारे लेसर गाईडेड क्षेपणास्त्र वापरून हवाई लक्ष्य नष्ट करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. यामुळे अमेरिकन पॅट्रियट मिसाईल सिस्टम किंवा रशियन S-400 सारख्या महागड्या प्रणालींशिवाय संरक्षण शक्य होईल.
या प्रयोगानंतर चीननेही अशाच प्रकारच्या अनामित ड्रोनची चाचणी घेतली आहे, जे रॉकेटप्रमाणे थेट उभे उड्डाण करते आणि लँडिंग करते.