बिबट्या तीन दिवसांत हाती लागला नाही.. मग बिबट्या गेला कुठे?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी येथे तीन बालकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण तयार होऊन थंडीमध्ये अचानक वाढ झाल्याने सर्च ऑपरेशन सुद्धा विस्कळीत झाले आहे.

वनविभागाने राज्याच्या विविध भागातून सुमारे शंभर अधिकारी, तज्ञ कर्मचारी, वाहनांचा ताफा, शस्त्रे साधनसामग्री, गुंगी आणणारी औषधे असा सर्व फौजफाटा शोध मोहिमेसाठी तैनात करून जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी सध्या तालुक्यात तळ ठोकून आहेत. ऑपरेशन बिबट्या मोहिमेतील विस्कळीतपणा अजूनही न संपल्याने बिबट्या तीन दिवसांत हाती लागला नाही.

जिल्हा प्रशासनाकडूनही ताजी माहिती वारंवार विचारली जाऊन वनविभागाच्या शोध मोहिमेवर अधिकारी लक्ष ठेवून आहेत. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी म्हणतात अहोरात्र बिबट्या शोधतोय…. झोप नाही अन् सापडत नाही. ग्रामस्थ म्हणतात बिबट्याच्या दहशतीने झोप नाही. झोप तर सर्वांचीच उडाली. मग बिबट्या गेला कुठे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. औरंगाबाद व पुणे येथील पथके रविवारी तपास कार्यात सहभागी होऊन विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्याची संख्या वाढवण्यात आली.

बीड व नगर जिल्हा वनविभागाच्या वतीने गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये विशेषत: करंजी ते मोहटादेवी अशा पट्ट्यात संयुक्तपणे मोहीम राबवली जात आहे. शोध मोहिमेसाठी वनविभागाकडे निधीची कमतरता जाणवून गावपातळीवर पिंजऱ्यात ठेवण्यासाठी भक्ष विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी बिबट्यासारख्या प्राण्यांची लक्षणे असूनही तरसाने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत.

शोधमोहीम योग्य पद्धतीने सुरू नसून महामार्गाने वाहने पळवून बिबट्या कसा हाती लागेल, असा प्रश्न शिरसाटवाडीचे कार्यकर्ते भाऊसाहेब शिरसाठ यांनी विचारून कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील वनमित्र व तालुक्यातील सर्पमित्र संघटनांच्या सदस्यांचा शोध मोहिमेत सक्रिय सहभाग वाढला आहे. गावाबाहेर निर्जन व दुर्गम भागातील वस्तीवर राहणाऱ्या काही गावातील रहिवाशांना वनविभागाने संकटकाळी वाजवण्यासाठी फटाके दिले. ग्रामस्थ व प्रशासनाला चकवा देण्याएवढा बिबट्या चतूर झाला की शोध पथके योग्य दिशेने शोध घेत नाहीत, याबाबत लोकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

सायंकाळनंतर प्रत्येक गावातच नव्हे, तर शहरातही विविध उपनगरांमध्ये बिबट्याच्या दहशतीने लॉकडाऊन होते. बाजारपेठेवर बिबट्या प्रकरणाचा परिणाम जाणवू लागला. सायंकाळनंतर शक्यतो कोणी घराबाहेर पडत नाही. रविवारी सायंकाळपर्यंत काहीही हाती लागले नसल्याचे वन विभागाने सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment