सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावली असून, दिनांक २५ जुलै रोजी मुंबईत उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी दिनांक १८ जुलै रोजी विश्वस्त मंडळाच्या वतीने वकीलांनी कार्यालयात उपस्थित राहून पुढील तारखेची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर २५ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या अॅप घोटाळा व नोकर भरतीतील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर विधानभवनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित घोटाळ्यांची माहिती देत लवकरच विश्वस्त मंडळावर कारवाई करून विश्वस्तांना बरखास्त करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी अहिल्यानगर सायबर शाखेच्या माध्यमातून शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने एकूण ११ विश्वस्तांना नोटीस बजावून १८ जुलै रोजी म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले.