संगमनेर- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे केवळ काटे नव्हे, तर खरे ‘काटेरी’ सूत्रधार कोण आहेत, हे ओळखण्याचे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी जोरदारपणे मांडली.
संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध आंदोलनात छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन विकास मंच, गाथा परिवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांसारख्या विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. हिरालाल पगडाल, शिवसेनेचे अमर कतारी, अनिकेत घुले, अॅड. समीर लामखडे, राम अरगडे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, किरण रोहम, राजा आवसक, जावेद शेख, सुरेश झावरे आदी उपस्थित होते.
बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात छात्र भारती व राष्ट्रसेवा दलाच्या विद्यार्थी वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले की, सध्या भाजप धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. गुंडांच्या मदतीने लोकशाही संपवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. युवकांनी या देशविघातक शक्तींविरोधात
विचारांची लढाई उभी करणे आवश्यक आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, भाजपने जन सुरक्षा कायदा ‘भाजप रक्षा कायदा’ बनवला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आंदोलने करता येणार नाहीत. महाराष्ट्र बिहारसारखा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अनिकेत घुले, शिवसेनेचे अमर कतारी, प्रा. हिरालाल पगडाल, प्रा. उल्हास पाटील, अजय फटांगरे, दत्ता ढगे, किरण रोहम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. राहुल जराड, गणेश जोंधळे, विशाल शिंदे, मोहम्मद तांबोळी, गाथा भगत, मशिरा तांबोळी, सुमित खरात, अनिकेत खरात, अभिषेक वैराळ, सचिन आहेर, वैष्णव मुर्तडक यांच्यासह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तर कोरियामध्ये केवळ एकच वृत्तवाहिनी, एकच वृत्तपत्र असून तिथे हुकूमशाही सुरु आहे. सरकार सांगेल तेच ऐकावे लागते. आज भारतातही माध्यमांवर निर्बंध लादले जात आहेत. पत्रकारितेचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. माध्यमांनी जर वेळीच भूमिका घेतली नाही तर भारतातही उत्तर कोरियासारखी स्थिती निर्माण होईल, अशी तीव्र चिंता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.