कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा फक्त नुकसानच आले आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा सडत चालला आहे आणि बाजारात दर कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च करून मे महिन्यात कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले आणि चांगल्या प्रतीचा कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र, मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आणि नंतर वाढलेल्या नैसर्गिक आर्द्रतेमुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात खराब होतोय.

गेल्या पंधरा दिवसांपासून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झपाट्याने वाढली आहे. यामुळे कांद्याला मिळणारा दर प्रतिकिलो केवळ १२ ते १५ रुपयांवर आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक तोट्याचे सावट गडद झाले आहे. कांदा दराच्या या चढउतारामुळे आणि चाळीत सडणाऱ्या कांद्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
दक्षिणेकडील राज्यांतील स्पर्धेमुळे स्थानिक बाजारपेठांवर परिणाम
दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळसारख्या राज्यांत स्थानिक कांद्याची आवक वाढल्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्याच्या बाजारपेठांवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.
कांदा खरेदी धोरण ठरवावे
कांदा साठवणूक, दरातील अस्थिरता, निर्यातीवरील मर्यादा आणि वातावरणातील बदल यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करत कांदा खरेदी धोरण, हमीभाव यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा यंदा कांद्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
बांग्लादेशने खरेदी थांबवली, निर्यात ठप्प
भारताचा सर्वाधिक कांदा खरेदी करणारा बांग्लादेश या वर्षी स्वबळावर कांद्याचे बंपर उत्पादन घेण्यात यशस्वी झाला आहे. परिणामी, मागील तीन महिन्यांपासून बांग्लादेश सरकारने भारतीय कांद्याची खरेदी थांबवली आहे. याचा थेट परिणाम देशातील निर्यातीवर झाला असून, त्यामुळेही कांद्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
“दोन महिन्यांपूर्वी भाववाढीची अपेक्षा ठेवून कांदा चाळीत भरून ठेवला. आता जुलै महिना संपत आला तरी भाव वाढलेले नाहीत. याउलट चाळीतील कांदा खराब होतो आहे. मोठ्या नुकसानीची भीती आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” – प्रदीप काळे, कांदा उत्पादक शेतकरी