संगमनेर- महायुती सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मोकळीक दिली जात असून, राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकात थोरात यांनी म्हटले, की विधानसभेत झालेल्या गोंधळ, आमदार निवासातील भांडण आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीडमध्ये एका निरपराध सरपंचाला अमानुषरीत्या मारण्यात आले. एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, तर दुसऱ्या आमदाराने कॅन्टीनमधील वेटरला मारहाण केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना मारहाण करणारे गुंड भाजपचे पदाधिकारी आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

निळवंडे कालव्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, धरण व कालवे हे दुष्काळी जनतेसाठीच निर्माण करण्यात आले होते. यावर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने ओव्हरफ्लोचे पाणी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शासनाला पत्र दिले आहे. उर्वरित वितरिकांची कामे लवकर व्हावीत आणि या पाण्याचा लाभ उपेक्षित शेतकऱ्यांना मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
भाजपची राजकीय पातळी खालावली भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना एकप्रकारे मुभा दिली आहे. एखाद्या समाजावर टीका करणे, वडीलधाऱ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य करणे, ही आजची राजकीय पातळी बनली आहे. यामुळे राज्यात भयाचे वातावरण पसरले असून, ते भाजपच्या छुप्या पाठबळामुळेच असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
विधानसभेत गुंडांना संरक्षण थोरात म्हणाले की, मी ४० वर्षे आमदार म्हणून काम केले. वादविवाद विधानसभा कारभाराचा भाग असतो, परंतु त्या वेळी चहापानासाठी सगळे एकत्र यायचे. आता मात्र गुंड विधानसभेत येतात, मारहाण करतात आणि त्यांनाच संरक्षण दिले जाते. मारणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा, हा प्रकार लाजिरवाणा आहे. विधानसभेतील राडा जाणीवपूर्वक घडवून आणून दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.