राहुरीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. एकीकडे महिलांच्या अधिकारांसाठी उभं असणारं महिला आयोग, तर दुसरीकडे त्याच नावाचा गैरवापर करत महिलांना फसवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश झालाय. हे सगळं घडलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका पदाधिकाऱ्यामुळे. आणि या प्रकारामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसला आहे.
घटना अशी आहे की, राहुरीतले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी स्वतःची ओळख राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या खाजगी सहाय्यक म्हणून दिली. त्यांनी काही महिलांना फोन करून त्यांना दिशाभूल केली आणि खोट्या आश्वासनांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

हे सगळं एका कॉल रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आलं आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली. संबंधित संभाषण थेट आयोगाच्या हाती आलं आणि त्यातून स्पष्ट झालं की, भट्टड हे अध्यक्षांच्या नावाचा वापर करून महिलांची फसवणूक करत होते.
फक्त इतकंच नाही, तर या प्रकारात जळगावमधील दोन महिलाही सहभागी असल्याचा संशय आहे. या महिलांनी स्वतःला थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्याचं भासवत काहींना फसवल्याचा दावा आयोगाने आपल्या पत्रात केला आहे. मात्र, आयोगाने हे स्पष्ट केलं आहे की, सुनील भट्टड आणि या दोघी महिलांचा आयोगाशी कोणताही अधिकृत संबंध नाही. त्यामुळे हा प्रकार अधिकच गंभीर बनतो.
या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून सुनील भट्टड यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 318 आणि 319 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आयोगाने हेही सांगितलं आहे की, या प्रकरणात आर्थिक फसवणुकीची शक्यता लक्षात घेता त्वरीत कारवाई आवश्यक आहे. पोलिसांना पाच दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस या प्रकरणात काय घडते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
या घडामोडीनंतर सुनील भट्टड यांना पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षशिस्त भंग, पदाचा गैरवापर आणि पक्षाची बदनामी केल्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांच्या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.