संगमनेर- संगमनेरमधील गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने शासनाच्या मदतीचा पहिला टप्पा मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच दुसऱ्या मृत्यूमुखी पडलेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबासाठीही मदतीची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दिनांक १० जुलै २०२५ रोजी गटारीच्या चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देण्याचे लेखी पत्र दिले होते.

या सूचनेनुसार संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी तात्काळ कार्यवाही करत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मदतीचा पहिल्या टप्प्यातील १० लाख रुपयांचा धनादेश मयत अतुल पवार यांच्या आई-वडिलांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्त केला. या मदतीमुळे पवार कुटुंबीयांनी आमदार अमोल खताळ व नगरपरिषद प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
उर्वरित मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचेही मुख्याधिकारी कोकरे यांनी सांगितले.
पिंजारी कुटुंबासाठीही मदतीची मागणी
संगमनेर गटार दुर्घटनेच्या वेळी अतुल रतन पवार याला वाचवण्यासाठी गेलेल्या रियाज पिंजारी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनाही मदत मिळावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधत त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रियाज पिंजारीच्या कुटुंबाला मदत मिळावी, असा आग्रह धरला आहे.
महायुती सरकार प्रत्यक्ष काम करणारे
संगमनेर शहरातील संजय गांधीनगर येथील मयत अतुल रतन पवार यांच्या कुटुंबाला शासनाने जाहीर केलेल्या ३० लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाख रुपयांचा धनादेश मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या हस्ते घरपोच देण्यात आला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच देण्यात येणार आहे. महायुती सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करणारे सरकार असल्याचे व या दुर्दैवी घटनेवर राजकारण करणाऱ्यांना या कृतीतून चोख उत्तर मिळाले असल्याचे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवले.