भारतीय टीव्हीच्या इतिहासात एखादा शो प्रेक्षकांच्या मनात इतका खोलवर रुजतो की त्याचे पात्र, त्याची कहाणी, त्याचे संवाद वर्षानुवर्षं लोक विसरत नाहीत. असाच एक शो म्हणजे ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’. आता या आयकॉनिक मालिकेचा दुसरा सीझन, ‘क्युंकी सास भी कभी बहू थी 2’ नव्याने आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये पुन्हा रंगात आलेली आहे. एकता कपूरचा हा लेजेंडरी शो 29 जुलैपासून रात्री 10:30 वाजता स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे आणि त्यात एकदा पुन्हा ‘तुलसी’ म्हणजेच स्मृती इराणी दिसणार, ही बातमी ऐकून अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

29 जुलैपासून दुसरा सीझन
या शोने एक काळ गाजवला होता. कुठल्याही घरात, संध्याकाळी टीव्ही सुरू झाला की ‘क्युंकी…’ लागलेले असायचे. स्मृती इराणीने साकारलेली तुलसी, तिचे धैर्य, घरातील नातेसंबंध जपणारी ती स्त्री, अनेक घरांमध्ये आदर्श बनली होती. आणि आता जेव्हा तीच तुलसी पुन्हा येणार आहे, तेव्हा ती केवळ टीव्हीवरचा कमबॅक नाही, तर एक भावनिक प्रवासदेखील आहे. प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करणारा.
शोमध्ये फक्त तुलसीच नव्हे, तर आणखी दोन महत्वाची पात्रेही पुन्हा दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मौनी रॉयने साकारलेली कृष्णा तुलसी आणि पुलकित सम्राटचा लक्ष्य विराणी या दोन पात्रांचा पुन्हा शोमध्ये प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे.
ही बातमी येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उसळून आल्या. मौनी रॉयच्या कॅमिओबाबत सध्या चर्चेला जोर आहे. तिचा छोटा पण लक्षवेधी प्रवेश प्रेक्षकांसाठी एक खास आनंदाचा क्षण ठरणार आहे. पुलकित सम्राटदेखील लक्ष्यच्या भूमिकेत एक छोटा पण ठसा उमटवणारा भाग साकारणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
‘मंदिरा’चाही होणार कमबॅक?
याशिवाय, ‘मंदिरा’ हे देखील एक जुनं आणि लक्षात राहिलेलं पात्र पुन्हा परत येत आहे. मात्र, यावेळी मंदिरा बेदीऐवजी ही भूमिका अभिनेत्री बरखा बिश्त साकारणार असून तिने स्वतः याची अधिकृत घोषणा केली आहे. हा निर्णय देखील प्रेक्षकांना उत्सुकतेत टाकणारा आहे. एकूणच, ‘क्युंकी सास भी कभी बहू थी 2’ हा फक्त दुसरा सीझन नसून, तो त्या काळाच्या आठवणी पुन्हा जगवणारा एक भावनिक टप्पा आहे.