कधीकधी जीवनात छोटे क्षण मोठ्या प्रश्नांना जन्म देतात. लग्नासारख्या नात्यात वाद, ताणतणाव आणि कधीकधी चिडचिड होणे स्वाभाविक आहे. पण या सर्वांमध्ये ‘रागाच्या भरात पतीशी असभ्य बोलणे हे पाप मानले जाऊ शकते का?’ असा एक हळवासा, पण गंभीर प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या प्रश्नाचं उत्तर दिलंय वृंदावनच्या प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांनी, जे आपल्या गोड वाणी आणि भक्तिपूर्ण भाष्यांसाठी ओळखले जातात.

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?
एका महिलेनं थेट महाराजांना विचारलं की रागाच्या भरात पतीला असभ्य बोलणं पाप ठरतं का? त्यावर महाराजांनी अतिशय साध्या पण अर्थपूर्ण शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले की राग हा माणसाचा नैसर्गिक भाव आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. आपल्या शब्दांचं वजन आपण कधी विसरतो आणि त्या रागाच्या भरात दिलेली एखादी बोचरी टिप्पणी नात्यांवर खोल घाव करते, हे आपल्याला नंतर जाणवतं. त्यामुळे शांत राहणं, थोडा वेळ दूर जाणं आणि प्रसंगावर संयम ठेवणं हाच योग्य मार्ग आहे, असं त्यांनी सांगितलं.
महाराजांनी पुढे स्पष्ट केलं की आपल्या देशात पती-पत्नीचं नातं हे फक्त सामाजिक करार नाही, तर ते एक भावनिक आणि धार्मिक बंधन आहे. पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पतीला देवतुल्य मानलं जातं. खरं तर सर्व जीव हे ईश्वराचेच अंश आहेत आणि म्हणून कोणालाही कठोर बोलणं हे योग्य नाही. शब्दांची गोडी ही नात्यांची मधुरता वाढवते. गोड बोलणं हे केवळ चांगली माणुसकीच नाही, तर ते प्रेम टिकवण्याचं प्रभावी साधन आहे, असंही त्यांनी सांगितलं.
प्रेमाने नात्यांना फुलवा
भारतीय संस्कृतीत अनेक पिढ्यांपासून असे संस्कार दिले गेले आहेत की, स्त्रिया पतीच्या नावाचा उच्चारही करत नसत. त्यामागे केवळ परंपरा नव्हे, तर त्या नात्याबद्दल असलेला मनापासूनचा आदर होता. आज काळ बदलला आहे, जीवनशैलीही बदलली आहे, पण धर्माचं आणि नात्यांच्या पवित्रतेचं मोल तेवढंच आहे, हे प्रेमानंद महाराजांनी नम्रतेने स्पष्ट केलं.
शेवटी महाराजांनी अत्यंत मार्मिक विचार मांडला. आपण गोड बोललो तर आपलं प्रेम अधिक दृढ होतं. संकटं येतात, सहन करावं लागतं, पण त्यामध्ये एकमेकांवर राग काढणं नव्हे, तर एकमेकाला समजून घेणं आणि आधार देणं हाच नात्याचा खरा अर्थ आहे. म्हणूनच, कठोर शब्द टाळा आणि प्रेमाने नात्यांना फुलवा, असा गोड संदेश त्यांनी दिला.