अहिल्यानगर ब्रेकिंग : ट्रक जाळण्याचा कट उघड! पोलिसांच्या सतर्कतेने मोठी फसवणूक टळली

Published on -

राजूर : राजूरमध्ये एका ट्रकच्या आगीमागे केवळ अपघात नसून, मोठा फसवणुकीचा कट असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. इन्शुरन्स आणि फायनान्स कंपन्यांची भरपाई मिळविण्यासाठी ट्रक मुद्दाम जाळण्यात आल्याचे व यामध्ये चार जण सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजूर पोलिसांच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळीच थांबविण्यात यश आले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की ट्रक जाळून विमा कंपनीकडून भरपाई मिळविणे आणि फायनान्स कंपनीचे हफ्ते बुडविण्याचा कट राजुर पोलिसांनी वेळेवर उघडकीस आणला आहे. यामुळे एक मोठा अपघात आणि आर्थिक फसवणूक टळली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

सागर बाबुराव नवले (वय ३१, रा. स्वच्छंद बंगला, राजबिहारी रोड म्हसरुळ, नाशिक) याने १७ जुलै २०२५ रोजी रात्री २.३० वाजता राजुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की त्याचा टाटा कंपनीचा सीएनजी ट्रक विठे घाटात जळून खाक झाला. त्या वेळी ट्रक विशाल रनशेवरे चालवत होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा इन्शुरन्स आणि फायनान्स कंपन्यांची फसवणूक टळली संशय व्यक्त करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी पंचासमक्ष पाहणी केली आणि साक्षीदारांची सखोल चौकशी केली. तपासात स्पष्ट झाले की ट्रकला अपघाताने आग लागलेली नव्हती, तर तो मुद्दाम पेटवण्यात आला होता.

पोलिसांच्या कसून चौकशी केल्यानंतर सागर नवले व त्याचे सहकारी विशाल उत्तम रनशेवरे, अमोल शरद बारगजे आणि लहु शंकर आव्हाड यांनी ट्रकच्या मालवाहतूक भागात बारदानाच्या गोण्या टाकून लायटरच्या साहाय्याने त्याला पेटवले. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी व फायनान्स संस्थेला फसवण्यासाठी खोटा अपघात दाखविण्याचा डाव रचला होता. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ३२६ (फ), २४० व ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करत असून त्यांच्या मदतीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे, पोलीस नाईक संगिता आहेर आणि कॉन्स्टेबल अशोक गाढे आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

फसवणूक टळली

राजूर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि प्रभावी चौकशीमुळे विमा कंपनी व फायनान्स संस्थेची मोठी फसवणूक टळली. केवळ आर्थिक फायद्यासाठी इंधनाने भरलेला ट्रक मुद्दाम पेटवण्यात आल्याची बाब उघड झाली असून, ही कृती कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!