भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे असतात, जे मैदानावर झळकले नसले तरी प्रसिद्धीच्या झोतात कायम राहतात. यष्टीरक्षक आणि डावखुरा आक्रमक फलंदाज इशान किशन याच यादीतील एक नाव आहे. गेले काही महिने तो टीम इंडियाच्या बाहेर असला तरी त्याची लोकप्रियता, कमाई आणि लक्झरी जीवनशैली मात्र अजिबात थांबलेली नाही. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची एकूण संपत्ती, ब्रँड व्हॅल्यू आणि आयुष्याचा झगमगाट बघताना सहज लक्षात येतं की मैदानावर नसतानाही तो करोडोंच्या दुनियेत आपली जागा भक्कम ठेवून आहे.

इशान किशनचे कमाईचे स्त्रोत
इशान किशन याचा जन्म 18 जुलै 1998 रोजी झाला आणि यावर्षी त्याने 27 व्या वर्षात प्रवेश केला. गेल्या 2 वर्षांपासून तो भारतीय संघाच्या मुख्य संघात दिसलेला नाही. तरीही त्याच्या आर्थिक कमाईत कुठलाही खंड पडलेला नाही. उलट, त्याची कमाई आणि एकूण संपत्ती वर्षागणिक वाढतच आहे. यामागे मोठं कारण म्हणजे त्याचं IPLमधील स्थान आणि जाहिरात करार.
IPL 2025 च्या मेगा लिलावात, इशान किशनला सनरायझर्स हैदराबादने तब्बल 11.25 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतलं. याआधी तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता आणि त्याला तिथे 15.25 कोटी रुपये प्रति हंगाम मिळत होते. या सगळ्याच्या जोडीला बीसीसीआयनेही त्याला आपल्या केंद्रीय करारात समाविष्ट केलं आहे. ग्रेड-सीमध्ये असलेल्या इशानला दरवर्षी 1 कोटी रुपये वेगळे मिळतात.
केवळ क्रिकेट खेळूनच नव्हे, तर जाहिरातींच्या माध्यमातूनसुद्धा इशान प्रचंड कमाई करतो. स्केचर्स ब्लिट्झपूल, सीएट टायर्स, ओप्पो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत त्याने करार केले आहेत. या जाहिरातींमधून त्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई होते. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा ब्रँडनाही मिळतो आणि इशानला त्यातून आर्थिक स्थैर्य.
एकूण संपत्ती किती?
त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार इशान किशनची एकूण मालमत्ता सुमारे 60 कोटी रुपये इतकी आहे. ही संपत्ती केवळ क्रिकेट किंवा जाहिरातींमुळे नाही, तर त्याच्या जीवनशैलीतूनही लक्षात येते.
इशानला आलिशान घड्याळे आणि गाड्यांचा जबरदस्त शौक आहे. त्याच्याकडे रोलेक्स डे-डेट आणि झेनिथ डेफी स्कायलाइनसारखी महागडी घड्याळं आहेत, ज्यांची किंमत 20 ते 25 लाख रुपयांदरम्यान आहे. तसेच बीएमडब्ल्यू 5 सिरीज, फोर्ड मस्टँग आणि मर्सिडीज-बेंझ सी-क्लाससारख्या आलिशान गाड्याही त्याच्या ताफ्यात आहेत. या गाड्यांची किंमत कोटींमध्ये मोजावी लागते.