जग पुढे जात आहे, तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, नातेसंबंधांचं रूपांतर आता व्यवहारात होत चाललं आहे. कुठे तरी ही प्रगती वेदना बनून उभी राहते. जिथे प्रेम, काळजी, मायेचा स्पर्श यांचं मोल उरलेलं नाही. जपानमध्ये अलीकडेच ‘ओके ग्रँडमा’ नावाची सेवा सुरू झाली आहे, जिथे तुम्ही ‘आजी’ भाड्याने घेऊ शकता! ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे.

जपानमधील ‘ओके ग्रँडमा’ सेवा
टोकियोस्थित ‘क्लायंट पार्टनर्स’ नावाच्या कंपनीने सुरू केलेल्या या सेवेत, वय वर्ष 60 ते 94 दरम्यानच्या महिला त्यांच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वासह तुमच्या घरात येऊन भावनिक आधार देतात, स्वयंपाक करतात, घरकामात मदत करतात, मुलांची काळजी घेतात, आणि मुख्य म्हणजे तुमच्यासोबत वेळ घालवतात.
ही कल्पना दिसायला जरी इनोव्हेटिव्ह वाटत असली, तरी त्यामागे दडलेली कहाणी हृदय हेलावणारी आहे. कारण या सेवा देणाऱ्या ‘आजी’ त्यांच्या स्वतःच्या निवृत्त आयुष्याचा आनंद घेण्याऐवजी दुसऱ्यांच्या घरात “सेविका” होतात, तेही केवळ स्वतःच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी. कित्येक जणी विधवा आहेत, काही जणी एकट्या राहतात, काहींची मुलं दूर गेलेली आहेत.
जपानमधील स्थिती
या सेवा वापरणाऱ्यांच्या दृष्टीने मात्र ही एक वरदानासारखीच आहे. जपानमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती ही वृद्ध आहे. अनेकजण एकटे, उदास किंवा नातवंडांपासून दूर आहेत.
अशा वेळी ‘ओके ग्रँडमा’ सारख्या सेवा त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक औषध ठरतात. ‘ओके ग्रँडमा’ ही कल्पना काही अंशतः आशादायक आहे. कारण ती महिलांना आर्थिक स्वावलंबन देते.