इंग्लडमधील ‘या’ ऐतिहासिक क्रिकेट मैदानाचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी आहे अनोखा संबंध! वाचा इतिहास

Published on -

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान फक्त एक खेळाचे ठिकाण नसून, ते इतिहासाचा एक सजीव दस्तऐवज आहे. इंग्लंडमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने क्रिकेट मैदान असून, 1857 मध्ये याची स्थापना झाली. विशेष म्हणजे हेच ते वर्ष आहे जेव्हा भारतात पहिलं स्वातंत्र्ययुद्ध भडकले होते ज्याला ‘1857 चा उठाव’ म्हणतात. त्या वर्षी ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीय सैनिकांनी आणि जनतेने बंड पुकारले होते, आणि त्याच काळात ब्रिटनमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मैदान उभे राहिले होते. ही दोन भिन्न ठिकाणं एकाच काळात एक ऐतिहासिक वळण घेत होती.

भारतासाठी नेहमीच ठरले अपशकून

भारतीय संघासाठी हे मैदान फारसे शुभ ठरलेले नाही. भारताने येथे एकूण 9 कसोटी सामने खेळले असून, एकही सामना जिंकलेला नाही. 4 सामन्यांत पराभव झाला आणि 5 अनिर्णित राहिले. 1936 मध्ये भारताने येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. पण आजतागायत भारताला येथे विजय मिळवता आलेला नाही.

हे मैदान अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याने या मैदानावर दोनदा बॉम्बहल्ला केला होता. एकदा 1940 मध्ये आणि दुसऱ्यांदा 1941 मध्ये. कारण, याठिकाणी ब्रिटिश लष्कराचा डेपो होता.

सचिन तेंडुलकरचे शतक

या मैदानावर क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठे क्षण घडले आहेत. 1956 मध्ये इंग्लंडच्या ऑफ-स्पिनर जिम लेकरने एका कसोटीत तब्बल 19 विकेट्स घेऊन विक्रम केला. आणि 1990 मध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खास क्षण घडला. लहान वयातील सचिन तेंडुलकरने याच मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

आता 23 जुलैरोजी पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंड यांच्यात याच मैदानावर सामना होणार आहे. यावेळी भारताला केवळ सामना जिंकायचा नाही, तर 90 वर्षांपासूनच्या अपयशावरही विजय मिळवायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!