शिर्डी- येथील साईआश्रया अनाथालयाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २१ वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा पिंपळवाडी येथील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने संपूर्ण शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिर्डीजवळील पिंपळवाडी गावातील ग्रामपंचायतीच्या तळ्याच्या परिसरात शिवम दळवी नेहमीप्रमाणे सायंकाळी पायी फिरायला गेला होता. फिरत असताना हातपाय धुण्यासाठी तो तळ्याजवळ गेला आणि पाय घसरून तळ्यात पडला. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला.

शिर्डी पोलिसांनी त्वरेने शिर्डी व राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आणि राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या सूचनेनुसार दोन्ही ठिकाणांहून अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पिंपळवाडी ग्रामपंचायत तळ्यात पडलेल्या शिवम दळवीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि अखेर शनिवारी रात्री सुमारे ८ वाजता त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती शिर्डीत समजताच नागरिकांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे धाव घेतली. अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे गणेश दळवी पोरके झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या दुर्दैवी घटनेबद्दल अनेकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.