अहिल्यानगर- मोहरम विसर्जन मिरवणुकीत हरवलेले घड्याळ न दिल्याच्या कारणावरून मित्रांवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी मुकुंदनगरमधील आर. आर. बेकरीजवळ घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिरोज मोमीन (रा. मुकुंदनगर), साजिद लियाकत शेख (रा. तपोवन रोड अहिल्यानगर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अल्तमश नासिर पठाण (वय २८, रा. आर. आर. बेकरीजवळ मुकुंदनगर अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र आहेत. मोहरम विसर्जन मिरवणुकीत फिरोज मोमीन याच्या हातातील घड्याळ अल्तमश पठाण याच्याकडून हरवले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस मारहाण केली.
यावेळी जखमी साक्षीदार अमिर शेख फिर्यादीला वाचविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. तु जर माझे घड्याळ दिले नाही तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे तपास करीत आहेत.