पाथर्डी- त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो, असे म्हणत ग्रामीण भागातील खेड्यातून आलेल्या एका युवतीने पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाी विषची बाटली हाताने थापड मारून बाजूला केल्याने युवतीचा जीव वाचला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून युवतीला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात राहणारी एक युवती रविवारी सहा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी पोलीस ठाण्यात येऊन आतील बाकड्यावर बसली होती. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या लक्षात आले की, मुलगी काहीतरी बडबड करीत हातवारे करून औषध पिण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी तातडीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलावले. या वेळी एका महिला कर्मचाऱ्यांनी पळत जाऊन युवतीच्या हातातील बाटली खाली पाडली.

विषची बाटली हिसकावल्याने बरेचशे विष खाली सांडले. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, महिला पोलीस कर्मचारी शिंदे आणि सानप यांनी तातडीने युवतीला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी मनीषा खेडकर यांनी युवतीवर प्राथमिक उपचार करून तिला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये जाण्यासाठी पत्र दिले. युवतीला नगरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
समजलेल्या माहितीनुसारः सदर युवती ही मानसिक दृष्ट्या खचलेली असून, तिला कुणीतरी अधिकाऱ्याने फसवले असल्याचे समजते. युवती विष पिताना त्याच्याकडे खूप पैसे आहेत, हेच बोलत होती. ती दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात येऊन गेलेली आहे. युवतीला ज्यांनी फसवले त्याचे नातेवाईक व युवतीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात येऊन गेलेले आहेत. आम्हाला काही तक्रार करायची नाही. मात्र, माझे काही फोटो त्याच्याकडे आहेत, ते डिलीट करा, असा आग्रह युवती पोलिसांकडे धरत असल्याचे समजते.
रविवारी युवती पोलीस ठाण्यात आली ती विषाची बाटली घेऊनच. बाकड्यावर बसून ती विष पिताना जाधव यांनी पाहिले, त्यांनी महिला कर्मचाऱ्यास बोलावले. पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी युवतीच्या ताब्यातील बाटली हिसकावल्यामुळे विष तोंडात जाण्याऐवजी खाली पडले व पुढील अनर्थ टळला. युवतीने पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.