जामखेड- भारतीय संस्कृती व इतिहासात आपले जीवन सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत व अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील भाजपा, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, वकील संघटना, तसेच शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्यावतीने रविवार दि.१९ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना याबाबत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पाणी व्यवस्थापन तसेच आदर्श राज्यकारभाराद्वारे एक युग निर्माण केले. अशा थोर विभूतीबद्दल अपशब्द वापरणे हे संपूर्ण समाजाचा आणि राष्ट्राचा अवमान आहे. सदर व्यक्ती सुनील गोपाळराव उभे याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
सदर घटनेची दखल न घेतल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, तसेच महाराष्ट्र बंद करावे लागेल अशी तीव्र इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव, रासपाचे विकास मासाळ, भाजपाचे नेते मोहन गडदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, वचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, रासपाचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, नगरसेवक पवन राळेभात, अॅड. संग्राम पोले, गणेश पाटील, समाजसेविका अनिता ढोले, माजी ग्रामपंचायत सदस्य जाकीर बारुद, सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे, गणेश काळे, राजेंद्र शेलार, पै. सुरज पवार, सर्जेराव गंगावणे, आनंद खरात, पै.सागर टकले, आप्पा देवकाते, बाळासाहेब तांबे, अक्षय भोगे, संतोष मोरे, आकाश चंदन, नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.