पाथर्डी- मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरी शनिवारी रात्री चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने मिळून पाच तोळे सोने किंमत पाच लाख रुपये, असे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. खेडकर हे रात्री जेवण करून झोपले होते. रात्री दोन वाजण्याच्यादरम्यान त्यांना कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आल्याने जाग आली.
त्यांनी उठून पाहिले तर त्यांचा पुतण्या झोपलेल्या घराचा दरवाजा उघडा दिसला. पुतण्याला उठवले तेव्हा घरातील कपाटातून पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याचे उघड झाले. त्यांच्या शेजारील जाधव यांच्या घरातही चोरी झाली आहे.

पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी गेल. श्वानपथकाने रस्त्यापर्यंत माग दाखवला, तेथून चोरट्यांनी वाहनाचा वापर केला असावा, असे दिसते आहे. महादेव गुट्टे, भाऊसाहेब खेडकर, राजेंद्र मस्के, बटुळे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चोरीची माहिती घेतली. गुट्टे पुढील तपास करीत आहेत. मालेवाडी गावात गेल्या महिन्याभरात पाच ते सहा ठिकाणी चोरी झाली आहे.
पहिली चोरी झाली तेव्हा चोरटे सापडले असते तर पुन्हा घटना घडल्या नसत्या. दर चार दिवसांतून एकदा चोरीची घटना घडत आहे. मालेवाडी व परिसरातील गावांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी खरवंडी मालेवाडी परिसरातून होत आहे.