कोपरगाव- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरणं जुळवून येण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यसैनिक माधवराव कचेश्वर आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आ. आशुतोष काळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांची अनुपस्थिती तर व्यासपीठासह कार्यक्रमाला विखे समर्थकांची मोठी उपस्थिती हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार विखे पाटील आणि शहरातील मान्यवर नेते यांच्यातील जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय परिस्थितीचा विचार करता काळे आणि कोल्हे यांच्यातच सातत्याने लढाई झालेली आहे. विखे समर्थकांची संख्यादेखील कोपरगावात मोठी आहे. शनिवारी विखे यांच्या हस्ते कोपरगावात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांमुळे विखे समर्थक चार्ज झाल्याची चर्चा शहरात सुरू होती. यापूर्वीही काही जणांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री विखे यांना कोपरगावमध्ये आणून कोल्हेंना डिवचण्याचे काम केलेले आहे; परंतु कालचा कार्यक्रम हा सर्वार्थाने वेगळा होता. या कार्यक्रमात व्यासपीठावर बिपीन कोल्हे व नामदार विखे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा होताना दिसत होती.

माजी आमदार अशोक काळेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते, असे असले तरीही आ. काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची अनुपस्थिती मात्र खटकणारी व चर्चेचा विषय ठरली. यामुळे आपसूकच विखे समर्थकांच्या काहीशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे असले तरीही यावेळी मात्र, नामदार विखे पाटील यांनी कोल्हे असो की, काळे यांच्यावर बोलणे कटाक्षाने टाळले. विशेष म्हणजे बिपीन कोल्हे यांनी पाणी प्रश्नावर केलेली मागणीदेखील मंत्री विखे यांनी मान्य केली. त्यामुळे अनेकांचा हिरमोडदेखील झाला आहे.
कोपरगावमध्ये विखेंच्या रुपाने तिसरी शक्ती येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिरंगी लढत व्हावी, अशी अनेकांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही. अनेकदा याचा प्रत्ययदेखील कोपरगावकरांना आलेला आहे. माधवराव आप्पा यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने विजय आढाव व संपूर्ण आढाव परिवाराने शहरातील सर्वांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; मात्र विखे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते. त्यामानाने कोल्हे व काळे यांचे कार्यकर्ते फारसे दिसत नव्हते.
नुकताच मंत्री विखेंच्या हस्ते संघ, जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने समर्पित कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला. व्यापारी धर्मशाळेत जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांचीच मोठी संख्या होती. आणखी खोलात जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास जनतेतून नगराध्यक्ष असल्याने अनेक जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान, सामाजिक ताकद आणि पाठिशी असणारी मतांची आकडेवारी व या दोन नेत्यांकडे असलेली कार्यकर्त्यांची व इच्छुकांची फौज पाहता, आपली वर्णी लागेल का या भीतीपोटी कोपरगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. या बदलांचे संकेत स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांची ही राजकीय जवळीक आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
सध्या राज्य सरकारमध्ये काळे-कोल्हे- विखे हे एकाच युतीमध्ये आहेत. परंतु प्रत्येकाला मतदार संघात आपले वर्चस्व -हवे-हवे आहे. यामुळे कोपरगावात स्थानिक – स्वराज्य संस्थेसाठी काळे- कोल्हे- विखे, अशी तिरंगी लढत दिसणार की अनेकांनी बांधलेले इमले कोसळणार हे मात्र येणारा – काळ ठरवेल.