श्रीरामपूर- खंडाळा, नांदूर, ममदापूर, राजुरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे खंडाळ्यातील नवाळे यांच्या भाडेकरूची मोटारसायकल चोरी गेल्याची घटना घडली.
परिसरात रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी ड्रोन फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी सांगितले की, हे ड्रोन संध्याकाळी उशिरा किंवा मध्यरात्री उड्डाण घेत असून, त्याद्वारे गावातील वस्ती व शेती परिसराची टेहाळणी केली जात असल्याचा संशय आहे. नागरिक यामुळे प्रचंड चिंतेत असून गावांमध्ये अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगली जात आहे.

नांदूर येथील श्री. नरोडे यांच्या वस्तीवर पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरली. त्याच रात्री लांडेवाडी येथील एका वस्तीवर चोरटे गेले होते. गेल्या आठवड्यात ममदापूर शिवारातील श्री. रोकडे यांच्या वस्तीवर चोरीची घटना घडली. एका डाळिंब बागेतून फळांची चोरीही झाली. या सर्व घटनांमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता खंडाळ्यातील नवाळे यांच्या भाडेकरूची मोटारसायकल चोरी गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे नागरिक अधिकच धास्तावले आहेत. तीन दिवसांपूर्वी खंडाळा येथील शिंगोटे यांच्या वस्तीमागून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ड्रोन उडवले गेले. त्यावेळी काही बॅटऱ्यांचे लाईट चमकलेले दिसले. तेथून जाणाऱ्या एका शेतकऱ्याने ही माहिती श्री. शिंगोटे यांना दिली.
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ही माहिती इतरांना देण्यात आली. ड्रोन गणपती मंदिराच्या दिशेने गेले होते. त्यामुळे गावातील अनेक तरुणांनी संघटीतपणे त्याचा पाठलाग केला, परंतु ड्रोन कुणाचा होता हे समजू शकले नाही.