तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉटेलमध्ये, बारमध्ये किंवा खास प्रसंगी दारू कायमच काचेच्या ग्लासमध्येच दिली जाते? स्टील किंवा प्लास्टिकचे ग्लास कितीही मजबूत असले, तरी दारू त्यात का नाही दिली जात? हा काही फक्त प्रतिष्ठेचा किंवा सौंदर्याचा मुद्दा नाही. यामागे अनेक वैज्ञानिक, मानसिक आणि इंद्रियांच्या संवेदनेशी संबंधित कारणं आहेत, जी दारूचा संपूर्ण अनुभव अधिक परिपूर्ण आणि समृद्ध करतात.
जाणून घ्या कारण
काच ही एक अशी वस्तू आहे जी कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे दारूची खरी चव, रंग आणि सुगंध जसा आहे तसाच टिकून राहतो. उदाहरणार्थ, प्लास्टिकच्या ग्लासमध्ये दारू ओतल्यास त्याला एक विशिष्ट वास आणि चव येते, जो मूळ पेयाच्या चवेमध्ये हस्तक्षेप करतो. काच मात्र तटस्थ राहते, ज्यामुळे व्हिस्कीचा अंबर रंग, वाइनची लालसर चमक किंवा बिअरचा फेसाळ पोत स्पष्ट दिसतो आणि अनुभव अधिक समृद्ध होतो.

याशिवाय, काच थर्मल इन्सुलेटर असल्यामुळे तुमच्या हाताची उष्णता दारूपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे थंड पिण्याचा अनुभव कायम राहतो. वाइन किंवा ब्रँडीसाठी वापरले जाणारे पातळ देठ असलेले ग्लास यासाठीच डिझाइन केलेले असतात, जेणेकरून पेयाचे तापमान नैसर्गिक राहील. स्टील थंडपणा शोषून घेतो आणि प्लास्टिक उष्णतेमध्ये स्वरूप बदलतो, त्यामुळे स्वाद बिघडतो.
स्वच्छता आणि गंध
दारू पिताना गंधाचं महत्त्व खूप असतं. स्वादाच्या 75% अनुभूतीचा संबंध वासाशी असतो. काचेचे ग्लास गंध एकत्र करून योग्य पद्धतीने नाकापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे सुगंध आणि स्वाद दोन्ही खुलून समोर येतात. प्लास्टिक किंवा स्टील या अनुभवाला मर्यादा आणतात.
तसेच, दोन काचेचे ग्लास एकत्र वाजवले असता होणारा ‘क्लिंक’ आवाज हा फक्त आवाज नसतो, तो एक उत्सवाचा क्षण असतो. तो ऐकताना मन आनंदाने भरून येतं. स्टील किंवा प्लास्टिकमध्ये ही भावना येत नाही. याशिवाय, काच छिद्ररहित असल्याने त्यात कोणतेही जीवाणू टिकत नाहीत, योग्य स्वच्छतेने ती सुरक्षित राहते. म्हणूनच वाइन, व्हिस्की, रम, बिअरसाठी काचच वापरली जाते.