करंजी- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मुळा धरणातून बुधवार (दि. २३) रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा धरणात २० हजार दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून, उजवा व डाव्या कालव्यामधूनदेखील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे.

वांबोरी चारी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे वांबोरी चारीचे पाणी सोडून लाभधारक तलाव – बंधारे भरण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता वांबोरी चारीला पाणी सोडावे, अशी मागणी राहुरी मतदारसंघाचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करताच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वांबोरीला चारीला पाणी सोडण्याचे आदेश मुळा धरण प्रशासनाला दिले आहेत.
बुधवार (दि.२३) रोजी दुपारी २ वाजता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे वांबोरी चारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना य पाण्यामुळे निश्चितपणे काहिसा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिलेली असतानाच मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचा निर्णय आ. कर्डिले यांनी घेतल्याने शेतकऱ्यांच्यादेखील अशा पल्लवीत झाल्या आहेत.